फळ पीक विमा योजनेत हवामान घटकांत बदल करा !*
सिंधुदुर्गनगरी
सन २०२५-२६ च्या पुनर्रचित फळ पीक विमा योजनेसाठी हवामानाच्या घटकांमध्ये बदल करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, यावर्षी १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हवामानावर आधारित पुनर्रचित फळ पीक विमा योजनेसाठी अर्ज करायचे आहेत. २०२४-२५ मध्ये काजू व आंबा उत्पादन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून काजू पिकासाठी विमा उतरणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही फायदा झालेला नाही. हवामानाचे जे घटक सिंधुदुर्गसाठी निर्धारित करण्यात आले आहेत, ते चुकीचे आहेत. काजूसाठी बदल करताना धुक्या (खार) चा समावेश होणे गरजेचे आहे. आंबा फळ पिकाकरिता १ डिसेंबर ते १५ में जोखीम कालावधी असून त्यात बदल करून ३० में जोखीम कालावधी करण्याची गरज आहे. सातबारा क्षेत्रांमध्ये इतर खातेदार असतील, तर कुलमुखत्यारपत्र किंवा संमतीपत्रावर एका व्यक्तीने घेतलं असेल, तर जेणेकरून त्याचा प्रस्ताव विभाग कंपनीने रिझल्ट करू नये. याची फळ पीक विमा भरण्यापूर्वी जिल्हा विमा प्रतिनिधींनी खात्री करून जिल्हा प्रशासनावर विमा कंपनीला सूचना द्यावी. कारण २०२४-२५ मधील अशा शेतकऱ्यांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
काजूचा जोखीम कालावधी १ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी असून तो बदल करून ३० मार्च करावा आदी मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय, महेश चव्हाण, प्रकाश वारंग, यशवंत तेली, सचिन मुळीक, तुषार चिंचकर व इतर उपस्थित होते.
