*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते यांच्या काव्याचे कवयित्री सौ. ऐश्वर्या डगांवकर यांनी केलेलं रसग्रहण*
*वास्तव*
〰️〰️〰️
आज आटली शब्दगंगा
वितळल्या प्रीतीभावना
विर्घळल्या आत्मसंवेदना
रुजल्या स्वार्थी संकल्पना
गगन उदास कल्लोळलेले
निर्जीव साऱ्या प्रीतभावना
सुखाचे महालही मृगजळी
भौतिक वैभवाचीच याचना
अशाश्वत अर्थहीन जगणे
शुचितेच्याच व्यर्थ वल्गना
जगण्याचाही अर्थ संभ्रमी
भुलवी भव्यदिव्य लोचना
ओलावा प्रीतीचाच दुर्मिळ
निष्पाप स्पर्श तो जाणवेना
अर्थही जगण्याचेच बदलले
सत्यार्थ उमजेल कां ? मना
जन्म मृत्यू प्रवास अनभिज्ञ
कळते वास्तवा बिलगताना
आता सांजाळ गुलमुसलेली
दिसतो सावळा खुणावताना
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*वि.ग.सातपुते. (भावकवी)*
📞 *9766544980*
〰️〰️〰️〰️
*विगसा* आप्पांची सुंदर कविता.
या कवितेत जीवनाचे कटू सत्य आप्पांनी उलगडली आहे.एक वेळ अशी येते की या जगात प्रेमाची भावना संपली आहे की काय ?मग सर्व हळूवार संवेदना स्वार्थापोटी नाहीशा होत चालल्या आहेत.अशावेळी हृदयातून शब्द कसे स्फुरणार?
मनआभाळ उदास झाले आहे.सर्व भावना वरवरच्या आहेत आणि सर्व सुख देखील एका मृगजळासमान आहे ज्यामागे सर्व जग धावत आहे तरी ते हाती येतच नाही.
अशाश्वत निरर्थक जगणे .या जगात केवळ एकच शाश्वत सत्य आहे ते म्हणजे मृत्यू.बाकी
पावित्र्याच्या,शुद्धतेच्या सर्व कल्पना पोकळ आहे वरवरच्या आहे.जगण्याचे अर्थही खरे काय खोटे काय च्या संभ्रमात आहेत.फक्त भव्य दिव्य तेच डोळ्यांना दिसतं आणि भावतं
प्रेमात ,वागण्यात ओलावा नाही.प्रत्येकाचे वागणे स्वार्थाने
माखलेले त्यामुळे निखळ जगणं मनुष्य विसरला आहे.कधीतरी त्याच्या मनाला हे उमजेल का?खरं जगणं याला म्हणत नाही.जो दूस-याच्या सुखासाठी झटतो त्यांचे सुखदुःख आपले मानतो.दूस-याचे मन जपतो ती खरी माणुसकी मनुष्य विसरत चालला आहे.
जन्मल्यापासून ते मरणापर्यंत खरंतर सर्व काही ‘ त्या ‘च्या इच्छेनुसार घडत असतं.जो क्षण आपण जगतो तो फक्त आपला पुढे काय आहे याची अनभिज्ञता मनुष्य जाणतच नाही.किंवा जे घडून गेलं ते आपल्या हातात नव्हतंच.पण हे पण त्याला कळत नाही.तो तर सदैव मीपणाच्या अहंकारात जगत असतो.जेव्हा हे सत्य कळते तोपर्यंत जीवनाची
संध्याकाळ झालेली असते.आणि दूर क्षितीजावर ‘तो ‘खुणावत असतो.
जीवनाचा अर्थ खूप सुंदर समजावताना आप्पा सर्वांना इशारा देत आहेत की खरं जगणं काय आहे हे नीट समजून घ्या.उगाच भौतिक सुखाच्या मागे धावताना शाश्वत सत्य काय आहे ते समजून घ्या.
सर्व काही ‘ कर्ता करविता ‘
तोच आहे .
*सौ ऐश्वर्या डगांवकर पुणे*
भ्रमणध्वनी ९३२९७३६६७५
