You are currently viewing सिंधुदुर्ग भाजपात राणे v/s चव्हाण गटात अंतर्गत गटबाजी..?

सिंधुदुर्ग भाजपात राणे v/s चव्हाण गटात अंतर्गत गटबाजी..?

राजकीय विशेष….

*सिंधुदुर्ग भाजपात राणे v/s चव्हाण गटात अंतर्गत गटबाजी..?*

*अजय गोंदावळे यांच्या पक्ष त्यागानंतर पोटातील आलंय ओठात*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गेल्या पंचवीस तीस वर्षांचा राजकीय अभ्यास केला असता जिथे राणे तिथे सत्ता.. अशीच परिस्थिती आपण पाहत आलो आहोत. मध्यंतरी काही वर्षे सावंतवाडी, कुडाळ मतदारसंघात आमदार दिपक केसरकर यांनी आपला करिष्मा दाखवून राणेंना जोरदार धक्का दिला होता परंतु, बदलत्या राजकीय प्रवाहात राणे केसरकर दिलजमाई झाली आणि पुन्हा एकदा राणेंचा वरचष्मा जिल्ह्यात दिसू लागला. किंबहुना जिल्ह्यातील बरीचशी सत्तास्थाने महायुतीकडे गेली. देवगड विधानसभा भाजपा तर सावंतवाडी, कुडाळ शिवसेनेकडे राहिली. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना शिंदेगट आणि भाजप प्रबळ पक्ष म्हणून समोर आले. परंतु…,

*भाजपाचे कार्यकर्ते फोडून दाखवा: इति- महेश सारंग*

राज्यात आणि केंद्रात भाजपा भले टेकू घेऊन सत्तेत राहिला तरी राज्यातील भाजपच्या नेत्यांची म्हणावी तशी सत्तेची गुर्मी कमी झालेली नाही. मागील अनुभवातून कोणताही धडा न घेता मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात मैत्रीपूर्ण लढती करण्याची दर्पोक्ती केली गेली. त्याचा परिणाम म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची भाषा करू लागले.. एवढेच नव्हे तर “कुणीही भाजपचे कार्यकर्ते फोडून दाखवा” असे खुले आव्हान सावंतवाडी मतदारसंघात कोलगावचे माजी पंचायत समिती सदस्य महेश सारंग यांनी दिले…आणि याला प्रत्युत्तर देताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भाजपाचे शहराध्यक्ष राहिलेले अजय गोंदवळे यांच्यासह जवळपास ४० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत भाजपाच्या आव्हानाची हवाच काढून टाकली नव्हे तर टायरच खोलून नेला. एवढेच नव्हे तर हा पक्षप्रवेश म्हणजे महेश सारंग यांना वाढदिवसाची भेट असल्याचे सांगून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले.
त्यामुळे जिल्ह्यात आणि राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेना पक्षातच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

*बाहेरचे येऊन सावंतवाडीत लावलावीचे कार्यक्रम करतात.. इति: अजय गोंदावळे*

सावंतवाडी शहर भाजपा निवडणुकीसाठी किंवा पक्ष वाढीसाठी सक्षम असताना सावंतवाडी शहराच्या किंबहुना तालुक्याच्याही बाहेरचे लोक येऊन शहरातील कार्यकर्त्यांमध्ये लावालावी करून शहर भाजपचे गट पाडताना दिसून आलेत. त्यामुळे शहर भाजपा विभागली गेली आणि अशा बाहेरील व्यक्ति शहरात कार्यरत झाल्याने आपल्याला पक्षाचे काम करायची संधी मिळत नसल्याने अजय गोंदावळे यांच्यासह सदैव तत्पर असणारे भाजपाचे कट्टर कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत डेरेदाखल झाले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी शहर भाजपा संकटात आली आणि त्यांना प्रत्येक वॉर्ड मध्ये समाजात चांगले नाव असणारा चेहरा निवडणुकीसाठी शोधण्याची वेळ आली..किंबहुना निवडणुकीत समाजातील, जनतेच्या मनातील चेहरा अशी ओळख असणाऱ्या लोकांकडे उमेदवारीसाठी उभे राहण्याची, भाजप पक्ष सर्व खर्च करून निवडून आणेल अशी ग्वाही देण्याची वेळ भाजपा कार्यकर्त्यांवर आली. कारण त्यांची ताकद असलेले कार्यकर्ते आज भाजपा मधील अंतर्गत गटबाजीमुळे भाजपाला रामराम ठोकून मित्रपक्षाच्या छावणीत दाखल होऊ लागले आहेत.
एकीकडे भाजपाचा जिल्ह्यातील निष्ठावंत चेहरा म्हणून ओळख असणारे आणि संघाच्या मुशीतून तयार झालेले प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी राज्याची जबाबदारी खांदावर घेतली आणि जिल्ह्याकडे त्यांचा काहीसा दुर्लक्ष झाला. परंतु जिल्ह्यातील त्यांची पकड मजबूत ठेवण्यासाठी तालुक्यात त्यांनी काही माणसांकडे जबाबदारी दिली आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे संदीप गावडे. आंबोली पंचायत समितीचे माजी सदस्य असलेले संदीप गावडे आंबोली पंचक्रोशीत कॅरम मधील स्ट्रायकर प्रमाणे आपला करिष्मा दाखवू शकतील कारण, त्यांच्या खांद्यावर चव्हाण साहेबांचा हात, पाठीशी त्यांचा वरदहस्त सर्व काही आहे पण, सावंतवाडी शहरात चव्हाण साहेबांचा हा स्ट्रायकर सोंगटी होईल हे नक्की..! कारण.., सावंतवाडीकर जनता कधीही शहराच्या बाहेरील माणसांना शहरात स्वीकारत नाही हा इतिहास आहे आणि आजही तो ताजा आहे हे मागील विधानसभा तीन निवडणुकीत केसरकरांनी राजन तेलींना, आणि यावेळी तेलींसह विशाल परब यांना दिलेला धोबीपछाड पाहिला असता लक्षात येतेच. परंतु अशी चव्हाण साहेबांच्या मर्जीतील माणसे सावंतवाडी शहरात येतात, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रम घेतात आणि तिथे शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांना डावलले जाते, किंमत दिली जात नाही त्यामुळे भाजपा पक्षाचे वरिष्ठ नेते स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत अपाहिज होताना दिसत आहेत.

*युवानेते विशाल परब यांचा भाजपा पुनर्प्रवेश भाजपच्या पथ्यावर पडणार की शिवसेनेच्या..?*

एकेकाळी बॉडीगार्ड घेऊन फिरणारे भाजपाचे तत्कालीन प्रदेशचे नेते विशाल परब यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात रणशिंग फुंकले. परंतु, रवींद्र चव्हाण यांचा वरदहस्त असताना देखील त्या रणशिंगाची पोकळ बासुरी झाली. त्यामुळे कुठेतरी जनतेच्या मनात असलेली विशाल परब यांची प्रतिमा ढासळली आणि त्यांच्यासाठी त्यावेळी जमलेली गर्दी ही त्यांची वोट बँक नव्हती तर फक्त आपल्या बँकेत पैसे भरण्यासाठीची लोकांची धडपड होती हे दिसून आले आहे. तद्नंतर महायुतीच्या उमेदवाराला विरोध करणाऱ्या विशाल परब यांना पुन्हा भाजपामध्ये प्रवेश देऊन विशाल परब हे आपणच मैदानात उतरवलेलं प्यादे होते हे आमदार रवींद्र चव्हाण यांनी जनतेला दाखवून दिले. एकप्रकारे लपून पाठीत वार केल्यासारखाच तो प्रकार घडला होता. त्यामुळे विशाल परब यांची लोकप्रियता कमी झालीच पण सावंतवाडीकरांच्या समोर आमदार रवींद्र चव्हाण यांची देखील पत घसरली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
विशाल परब यांनी जुन्याच शैलीत सावंतवाडी शहरात सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग यांच्या सोबतीने पक्षप्रवेश घेणे सुद्धा सुरू केले. सकाळी केलेले पक्ष प्रवेश संध्याकाळी माहेराला माघारी गेले असेही प्रकार झाले. सावंतवाडी येथील लाखे वस्तीत तर कार्यालयाचे उद्घाटन आहे असे खोटे सांगूनही पक्ष प्रवेश झाले आणि काही वेळेत फसवून पक्ष प्रवेश घेतले गेले अशी माहिती देऊन पक्ष प्रवेश केलेल्या महिलांनी “आमच्या रक्तात दिपकभाई केसरकर, आम्ही त्यांचीच माणसे” असे सांगून भाजपच्या विशाल परब मंडळींच्या पक्ष प्रवेशाची आणि पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी शहरात निवडणुकीपर्यंत सर्वच वातावरण तणावपूर्णही असेल आणि त्यातूनच मनोरंजनाचा देखील आस्वाद घेता येईल अशी खात्री वाटू लागली आहे.

*राणे चव्हाण यांच्यातील अंतर्गत गटबाजी शिवसेनेला पोषक*

राणेंनी भाजप प्रवेश केल्यावर देवगड आणि बांदा (ता.सावंतवाडी) पुरती मर्यादित असलेली भाजपा जिल्हाभर विस्तारली. रवींद्र चव्हाण यांच्या कल्पक नेतृत्वामुळे हळूहळू पाय पसरत असलेली भाजप भक्कम पाया मिळाल्याने कणखरपणे उभी राहिली. अचानक भाजपला आलेली सूज पाहून मूळ भाजप नेत्यांना जिल्ह्यात पक्ष विस्तारल्याची स्वप्ने पडू लागली. परंतु नाम. नितेश राणे आणि खास.नारायण राणे भाजपमध्ये असताना देखील आम.निलेश राणेंनी शिवसेनेचा रस्ता धरला एवढेच नव्हे तर जिल्ह्यात भाजपलाच आव्हान देत शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे शिवसैनिकांना देखील बळ मिळाले आणि जिल्ह्यात शिवसेनेची ताकद भक्कमपणे उभी राहिली. या सर्व घडामोडीत जिल्ह्यात भाजपा वाढल्याची खात्री झालेल्या मूळ भाजपावाले आम.रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष होताच जिल्ह्यात आपली ताकद दाखविण्यासाठी राणेंच्या जवळ असणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या कार्यप्रणाली मधून बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला. स्थानिक पातळीवर छोट्या छोट्या घडामोडी मोठे वळण घेतात तसे होऊन आज सावंतवाडीत भक्कम असलेली भाजपा पोखरली गेली, एवढेच नव्हे तर सावंतवाडी सारख्या शहरात भाजपकडे जनतेमध्ये जाण्यासाठी आश्वासक असा चेहराच कोणी राहिला नाही. त्यामुळे भाजपा आजच्या घडीला चार पावले मागे सरकली असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.
भाजपची त्रिमूर्ती म्हणून पुढे आलेले मनीष दळवी, महेश सारंग व विशाल परब यांनी मतदारसंघात पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून धर्म अधर्माची मर्यादा ओलांडून देखील असे पक्षप्रवेश सुरू आहेत. दरम्यान एका पक्षप्रवेश कार्यक्रमात मनीष दळवी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी तर मनीष दळवी यांनी कलंबिस्त येथे जाहीर केलेल्या मैत्रीपूर्ण लढतीची टिंगल उडवून यापुढे मैत्रीपूर्ण पक्षप्रवेश घेत राहणार असे सूतोवाच केले आणि मग कुणीही नाराज होऊ नका असेही सांगितले. त्यामुळे आव्हान देणाऱ्या भाजपामध्ये सावंतवाडीत आव्हान पेलणारे कितीजण राहिलेत..? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एकंदर जिल्ह्यात खास.नारायण राणे यांची भाजपा आणि मूळ भाजपवासी आम. रवींद्र चव्हाण यांची भाजपा असे गट तट उभे राहिलेत आणि हेच गटबाजीचे राजकारण भविष्यात कमळ चिखलातच फुलवून ठेवते की धनुष्यबाणाने विजयाचा वेध घेते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा