You are currently viewing सोहळा मातृत्वाचा

सोहळा मातृत्वाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*सोहळा मातृत्वाचा ….*

 

आई.. विधात्याला पडलेले फार सुंदर स्वप्न,

की ज्याची तुलना कशाशी ही होऊ शकत नाही.आईची तुलना फक्त आईशीच होऊ शकते. आईचे हे मन निर्माण करतांना विधात्याने काय बरे रसायन वापरले असेल.

त्याने सुवासिक कमळे, विविधरंगी गुलाब, प्राजक्त, बकुळ चाफा,चांदणी,जाईजुई,कर्दळी,आदी सर्व ताजी फुले आणून आधी तिचे मन घडवले

असेल. त्या शिवाय ती इतकी नाजुक, सुंदर

कोमल, भावनाशील, शांत, स्थीर, धीरगंभीर

निपजूच शकत नाही.म्हणून मुल कसं ही असो,

तिला ते जगातील सर्वात सुंदर वाटते.या फुलांप्रमाणेच ती त्याला जपते व निगराणी

करते. तळहाताचा पाळणा व डोळ्यात तेल

घालून जपणे या म्हणी समजून घेण्यासाठी

स्त्री जन्मातच जावे लागते त्या शिवाय त्याचा

अर्थ कितीही विद्वान असेल त्याला ही समजणे

शक्य नाही. खरंच, एकदा बाळ जन्मलं की ती

तिची रहात नाही. तिच्या जगण्याचे संदर्भच बदलून जातात.तिच्या जगण्याचे एकमेव कार्यक्षेत्र आता फक्त नि फक्त तिचे बाळ असते. त्या पुढे जगातील सर्व नाती आता गौण

असतात व कुणी काहीही म्हटले तरी तिला त्याची चिंता नसते.

 

असे हे आईपणाचे स्वप्न स्त्रियांना पडते तो दिवस तिच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा

क्षण असतो.ह्या दिवसाची जणू ती वाटच पहात असते.पण खरे कसोटीचे दिवस मात्र

इथून पुढे सुरू होतात.ती तिची रहात नाहीच!

तिचे सारे अस्तित्व आता बाळातच विलिन होऊन ती बाई ऐवजी आई म्हणूनच जन्म घेते.

ही एकमेव भुमिका आता केंद्रस्थानी ठेऊन तिचे

आईपण सुरू होते. बाकीच्या घरातील नाना भमिका असतातच पण…त्याही साऱ्या आईपणा केंद्रस्थानी ठेऊनच ती निभावते, तिथे

कुठलीही तडजोड तिला चालत नाही. ह्या एकमेव नात्यासाठी ती कुठल्याही नात्यावर पाणी सोडायला तयार असते, इतके हे नाते

तिच्या जीवाभावाचे, अतुल्य प्रेमाचे असते.

 

बाळ पोटात राहताच ती एका वेगळ्याच जगात

प्रवेश करते.रात्रंदिवस त्याच तंद्रित ती वावरते.

जीवापाड जपते. स्वत:वर बंधने घालून घेते.हे

खाऊ की नको, ते खाऊ का नको? आपल्या आवडी निवडींना पुर्ण मुरड घालून फक्त बाळाचीच काळजी, जे अजून जन्मालाही आले

नाही, त्याच्या साठी ते जगात येण्यापूर्वीच

त्यागाला सिद्ध होते जो तिच्या शेवटापर्यंत तिला घेऊन जातो. आयुष्यात भले कुणासाठी

कधी ती झुकली नसेल पण बाळासाठी कोणतीही तडजोड तिला मान्य नसते इतके

जीवघेणे हे नाते असते. नाही हो, नाही, हे नाते

शब्दात बांधणे कधी तरी शक्य आहे का?

 

नऊ महिने तिचे हे अनोखे, तिचे समग्र आयुष्य

बदलवून टाकणारे दिवस असतात. कारण इथून पुढे तिची भुमिकाच व जगण्याचे तात्पर्यही बदलून जाते. खरा कठिण काळ सुरू

होतो. प्रसव वेदनांचेही वर्णन करून त्या कधीच

कळणार नाहीत. त्या साठी अनुभवातून जावे लागते, कारण तो तिचा पुनर्जन्मच असतो. त्याला दुसरी उपमा नाही.असंख्य जीवघेण्या

यातनातून परमेश्वर तिची सुटका करतो ते फार

मोठे बक्षिस देऊन जे असते ते तिचे सुंदर गोंडस बाळ! अहाहा! एका डोळ्यात आसू व एका डोळ्यात हसू..! केवढा महान सोहळा असतो हा

मातृत्वाचा! कुण्या महाकवीला तरी शब्दबद्ध

करता येणे शक्य आहे काय? छे! छे! कुणाही

प्रतिभावंताला हा सोहळा शब्दबद्ध करणे शक्य नाहीच ! बाळ हातात येताच असंख्य मंगलवाद्ये तिच्या मनात वाजू लागतात. ती म्हणते, परमेश्वरा, भरपूर दु:खे स्त्रियांच्या वाट्याला तू दिलीस पण तुझ्या ह्या एका कृतीने तू त्या साऱ्यांची भरपाई करून टाकलीस, काय म्हणावे तुला? त्यामुळे तुझ्यावर रागावताही येत नाही रे! जा.. तुला

माफ करून टाकले ! अशी तिची भावना असते.

 

जगातील कोणतीही आई मुलावर चांगलेच संस्कार करणार, करते.त्याच्या भविष्याच्या

चिंतेतच एक एक क्षण वेचते.खस्ता खाते, ठोकर खाते पण पोराला त्याची झळ लागू देत

नाही. त्याच्या प्रत्येक कृतीत ढाली सारखी

पाठीशी उभी राहते. बाकीच्या असंख्य जबाबदाऱ्या शिरावर असतांनाही हा कोपरा मात्र कायम हळवा असतो. चुकला तरी चुकला

म्हणत नाही, दुखावत नाही. सांभाळून घेते कारण तो तिचा जीव की प्राण असतो.त्याला

दुखावले की तिलाच अनंत यातना होतात.पण

तो मार्गी लागला पाहिजे ही चिंता ही असतेच!

खरे म्हणजे स्त्री पूर्ण कुटुंबाचीच आई असते पण हे किती लोकांना कळते हाही प्रश्नच आहे.

 

तिचे नशिब चांगले असेल तर मुलगा चांगला निघतो. संस्कार केलेले असतातच हो, म्हणून

काय सगळी मुले गुणी निघतात काय? नाही.

बिघडवणारे घटक भरपूर असतात. मिडिया आहेच.अशा परिस्थितीत आपलं मूल ठीक आहे असं म्हणण्या इतपत आता परिस्थिती

बिघडलेली आहे. ते काही आपल्या हातात आता राहिलेले नाही.घरातही कधी कधी आपले जवळचे लोकच शत्रू असतात हे काही

आता गुपित राहिलेले नाही. म्हणजे बघा, समाज, बाजूचे वातावरण, कुटूंब, मिडिया, मित्र

या साऱ्यातून आपल्या मुलावर तिला लक्ष ठेवावे लागते.त्यातून आईच्या कष्टाची कदर

असेल तर मुलगा सन्मानाने वागवतो नाही तर

आहेच मग वृद्धाश्रम!

 

अजून समाज आहे, गल्ली आहे, नातलग आहेत, ते तर टपलेलेच असतात चोची मारायला, जखमा करायला.नवरा चांगला असेल तर ठीक नाही तर तिच्या आई पणाला

व बाई पणाला ही अर्थ रहात नाही व एवढे कष्ट उपसून जन्म वाया गेल्याचे दु:ख पदरी येते ते वेगळेच! इतकं का सोपं आहे का आईपण व बाईपण निभावणे! ती तर तारेवरची

कसरत आहे. आणि यश अपयश ठरवणारे घटक ही फार आहेत.आई म्हणून माता म्हणून

ती कुठे ही चुकत नसली तरी चूक ठरवणारे व

दोष देणारे आजूबाजुला काही कमी घटक नाहीत. त्या मुळे मातृत्वाचा सोहळा व आस कितीही सुंदर शब्द असला तरी ह्या मातृत्वाचे चिज

होईलच याची हमी कोणी ही देऊ शकत नाही.

कधी कधी तर ह्या काळजाच्या तुकड्याच्या

आड पैसा असा काही आडवा येतो की आई

असून वांझ पणाचे दु:ख तिच्या नशिबी येते

अशी ही परिस्थिती उद्भवते हे ही आपण पाहतो. मातृत्व थोरच आहे पण त्याची कदर

करणारे व ते आचरणात आणणारे किती आहेत? आजकाल तर बाईच्या किती चिंध्या

झाल्या आहेत व त्याची लक्तरे आपल्याच

भाऊबंदांनी वेशीला टांगलेली आपण बघतो

आहोत राजरोसपणे! त्या मुळे ह्या मातृत्वाला

किती किंमत राहिली आहे हे तुम्हीच ठरवा..

 

आपली ती आई…

दुसऱ्याची ती बाई…?

असे का हो?

 

धन्यवाद मंडळी…

 

आपलीच…

प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक

(९७६३६०५६४२)

दि : १२ मार्च २०२४

वेळ : दुपारी ३/५२

प्रतिक्रिया व्यक्त करा