आमची तत्व शमीच्या झाडावर ठेवत राजकारणात उतरलेलो नाही..!
भाजपा युवामोर्चाचे नेते आनंद शिरवलकर यांनी दिला रोखठोक प्रतिइशारा
भाजपा नेते माजी खासदार निलेशजी राणेसाहेब यांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगण्याच्या भानगडीत आमदार वैभव नाईक यांनी बिलकुल पडू नये. काळे गॉगल लावून पुलाखाली ठेकेदाराकडे खंडणी मागणारी त्यांची टिनपाट गॉगल-गँग म्हणजे शिवसैनिक नव्हेत. मुळातच स्वतःच्या ठेकेदारीच्या राजकारणापायी संपवून टाकलेल्या कट्टर शिवसैनिकांच्या वतीने बोलण्याचा त्यांना काडीचाही अधिकार नाही. राहता राहिला प्रश्न आमदार वैभव नाईकांसोबत वावरणाऱ्या भुक्कड गॉगल-गँगचा, त्यांनी माजी खासदार निलेश राणे साहेबांना हात लावण्याची हिंमत तेवढी दाखवावी, त्यासाठी तारीख आणि वेळ तुमची तुम्हीच जाहीर करा. आम्हीही बघतो हुंदडायला कोणाच्या कानात एवढे वारे भरलेत ते! राजकारणात उतरलो ते आमची तत्व शमीच्या झाडावर ठेऊन नव्हे, एवढे मात्र लक्षात ठेवा, असा खरमरीत प्रतिइशारा भाजपा युवामोर्चाचे नेते आनंद शिरवलकर यांनी आमदार वैभव नाईक यांना दिला आहे.
खासदार विनायक राऊत हे मातोश्रीचे चप्पलचोर असल्याचे निलेशजी राणे यांचे वाक्य हे वास्तवच आहे, हे आमदारांना लागलेल्या मिरचीवरून सर्वांच्याच लक्षात आले आहे. भाजपा नेते खासदार नारायणराव राणे यांच्यावर टीका करून वैभव नाईक हे मातोश्रीच्या समोर दयेचा रुमाल पसरू पहात आहेत. विनायक राऊत यांना अपशब्द बोलल्याबद्दल निलेश राणेसाहेबांना धमकी देणाऱ्या आमदार वैभव नाईकांनी तेव्हा राजापूरला शेपटी का घातली होती? नाणारप्रश्नी जाहीर समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांना चपलांनी मारा अशी चिथावणी खासदार विनायक राऊतनी दिली होती. तेव्हा शिवसेनेच्या महिला जि.प.सदस्या सौ.लक्ष्मी शिवलकर यांनी भरसभेत “विनायक राऊत समोर आले तर चपलेंने थोबाड फोडेन” असे वक्तव्य केले होते. त्यावेळी हे खासदार-समर्थक आमदार वैभव नाईक कुठल्या बिळात लपले होते? लाज वाटायला पाहिजे असल्या या आमदार- खासदारांना! शिवसैनिकांनी तुमचे पाणी कधीच जोखले आहे, तेव्हा उगाच त्यांचे नाव वापरत राजकारण करू नका. कोकणच्या विकासाचा सत्यानाश केलेल्या तुमच्यासारख्या नेत्यांचे आणि तुमच्या ठेकेदार-खंडणीबाज टोळक्याचे थोबाड फोडण्यासाठीच आता शिवसैनिक बाहेर पडणाऱ आहेत. तेव्हा आधी आपली काळजी घ्या, निलेश राणेंना हात लावणारा अजून जन्माला यायचा आहे, त्याचा विचारच सोडा असा सडेतोड प्रतिहल्ला श्री आनंद शिरवलकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या वक्तव्यावर चढवला आहे.