You are currently viewing सोनपावलांनी येते दिवाळी

सोनपावलांनी येते दिवाळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*सोनपावलांनी येते दिवाळी*

 

*लावण्याचा साज चढवुनी*

*सोनपावलांनी दिवाळी येते*

*तेजोमय दिव्यज्योतींनी*

*सुखशांतीचे आंदण देते*

 

दिवाळी म्हणजे दीपांची मालिका. आनंदाची उधळण करत सौख्याचे असंख्य दिवे प्रज्वलित करणारा… मनातील नैराश्याचा अंधःकार दूर करणारा सण म्हणजे दीपावली. संपूर्ण भारतात अश्विन महिन्यात हा सण साजरा करतात. हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा हा सणांचा राजा. महिनाभर आधीच या राजाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होते.

रोशणाईच्या सामानांनी बाजार जगमगतात. प्रत्येक घराचा कोपरा स्वच्छ अंघोळ करून लखलखतो. सुंदर रंगरंगोटीमुळे घराचे रूपच पालटते. ठेवणीतली तांब्या पितळेची भांडी सोन्यासारखी चमकतात. उत्साहाचा , चैतन्याचा झरा घराच्या भींतीतून, दाराखिडक्यांतून मंद झोके घेत वाहू लागतो. दीपावलीच्या स्वागतासाठी नाजूक तोरणे दारावर लटकू लागतात.

स्वयंपाक घरातून लाडू, शेव, चिवडा, शंकरपाळ्या, अनारसे, चकल्या इत्यादी पदार्थांचा घमघमाट दरवळू लागतो. त्या खमंग वासाने चिमुकल्यांच्या पोटात भुकेने खड्डा पडतो. या पदार्थांचा आस्वाद घेत परिसरातील माती आणतात. ती मळून त्या मातीला आकार देतात. नाविन्यपूर्ण व स्वतःच्या आवडीच्या या उद्योगांत घराघरातील बालकलाकार रमतात. सर्व दोस्त एकत्र येत मेहनतीने आपली सृजनशक्ती पणाला लावतात.मनमोहक किल्ले बनवतात.किल्ल्यावरील तटबंदी, बुरुज, गावे, घरे, पाण्याची व्यवस्था सर्व काही कल्पकतेने उभारतात.बांबूच्या काठ्यांपासून रंगीत कागदापासून आकाश कंदील बनवतात भेटकार्डे तयार करतात मातीच्या पणत्यांवर नक्षीकाम करतात. या विविधांगी छंदांमध्ये रंगलेली मुले घराघरातून दिसतात. एरव्ही मोबाईलला तासान तास डोळे लावून बसलेल्या मुलांची वेगळीच रूपे दिवाळीत पहायला मिळतात.

सृजनशीलता, कल्पकता, जिद्द, चिकाटी, मेहनत, सहकार्य अशा विविध गुणांची रुजवण ही दिवाळी माणसांमध्ये करते.

14 वर्षाचा वनवास संपवून राम सीता व लक्ष्मण अयोध्या नगरीत परतले होते. त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरीत दिवे प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला होता.तेव्हापासून आजपर्यंत घराघरात या दिवशी दिव्यांची सुंदर आरास केली जाते. उंचावर आकाश कंदील लावले जातात.विद्युत रोषणाई करून घर सजवले जाते. अंगणात सुंदर रांगोळ्या रेखाटतात. गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाचे घर चैतन्याने उजळते.

नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री नंतर नरकासुराचा पुतळा जाळला जातो.म्हणजेच समाजातील वाईट प्रवृत्ती अग्नीत भस्म केल्या जातात.प्रभात समयी सुगंधित उटणे लावून अभ्यंग स्नान केले जाते.श्रीकृष्णाचे मुखी नाव घेत राक्षसाचे प्रतीक पायाखाली चिरडले जाते . म्हणजेच दृष्टांचा नाश करत सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश घेऊन येणाऱ्या दीपावलीचे स्वागत जल्लोषात केले जाते.गोड तिखट फराळाचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.झगमगते नवनवीन पोशाख अंगावर परिधान करत समाजातील लोक एकत्र येतात. कुटुंबात प्रेम, माया, आपुलकीने नात्यांची वीण घट्ट विणण्याचे काम दीपावली करते.राग, रुसवे विसरून घरातील लक्ष्मीची पूजा केली जाते. गो ग्रास देऊन गोमतेला वंदन केले जाते.ममतेच्या निरांजनांनी बहीण भावाला ओवाळते. भावाच्या सौख्यासाठी देवाला साकडे घालते. त्याच आपुलकीने भाऊ बहिणीला सुख समृद्धीची ओवाळणी घालतो.

दीपावली पाडव्याला पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी पतीला औक्षण करते.आपल्या गृहलक्ष्मीला सुखात ठेवण्याचे वचन पतीदेव पत्नीला देतो.

सलग पाच दिवस झगमगत्या रोषणाईत आकंठ बुडालेला, आनंदाची, समृद्धीची मुक्त हस्ते उधळण करणारा हा दिपोत्सव माणसाच्या मेंदूवरील ताण तणावाचा दाब कमी करतो. लोभ,मत्सर द्वेष या राक्षसांचा नायनाट करतो. प्रेम, माया, आपुलकीने हृदयाचा माठ भरतो . चेहऱ्यावर हास्य ज्योत फुलवतो.

 

*✒️#© सौ आदिती धोंडी मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

मो.नं9404395563

प्रतिक्रिया व्यक्त करा