You are currently viewing सहज, सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीर संपन्न….

सहज, सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीर संपन्न….

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे सहज, सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी हा मार्दगर्शनपर उपक्रम नुकताच राबविण्यात आला. यावेळी उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव यांनी मार्गदर्शन व शंका निरसन केले.

            यावेळी सहाय्यक आयुक्त तथा संशोधन अधिकारी जयंत चाचरकर, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

            12 वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र अशा उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. सदर प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी करणे, प्रमाणपत्र देणे यासाठी समितीला पुरेसा वेळ आवश्यक असतो. उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होऊ नये या उद्देशाने या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

                अर्जदारांनी त्यांच्या मुळ गावी जात प्रमाणपत्र काढुन त्या जिल्ह्याच्या समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावा. जात प्रमाणपत्रावरील नोंदी योग्य असल्याची खात्री करावी. प्रवेश प्रक्रियेच्या 5 महिन्यांपूर्वी अर्ज सादर करावा. मानिव दुनांकापूर्वीचा सर्वात जुना पुरावा हा महत्वाचा आहे. तसेच मुळ कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वतः बदल करु नये. महाराष्ट्रातील मुळ रहिवाशी असल्यास त्याला महाराष्ट्र राज्यातील लाभ मिळतील. तसेच न्यू ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करावी. त्यानंतर 30 दिवसांत समिती कार्यालयात अर्ज आणुन द्यावा. त्यावेळी सर्व कागदपत्रांच्या मुळ व सुस्पष्ट प्रती सादर करणे आवश्यक आहे. अर्ज कसा भरावा, वंशावळ प्रतिज्ञापत्र कसे करावे अशा विविध मुद्यांची सविस्तर महिती या शिबीरामध्ये देण्यात आली. 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी 31 मार्च 2021 रोजी पर्यंत अर्ज सादर करावेत. तसेच अन्य व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी सी.ई.टी. चा अर्ज भरल्यावर त्वरीत अर्ज सादर करावा असे आवाहन महाविद्यालयातील उपस्थित प्रतिनिधींना करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जयंत चाचरकर यांनी शिष्यवृत्ती योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा