देवगड येथील ज्येष्ठ व्यापारी शशिकांत कुळकर्णी यांचे निधन
देवगड
देवगड येथील ज्येष्ठ व्यापारी शशिकांत जनार्दन कुळकर्णी (८८) यांचे शुक्रवारी दुपारी २.३० वा. च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. शशी काका कुळकर्णी या नावाने ते सुपरिचित होते.
देवगड शहरात सुमारे ६० वर्षे त्यांनी मेडिकल व्यवसाय सांभाळला होता. मेडिकल व्यवसायात कुळकर्णी परिवारातील दुसऱ्या पिढीचे ते सदस्य होते. वृद्धापकाळामुळे त्यांनी आपला मेडिकल व्यवसाय तिसऱ्या पिढीकडे अर्थात त्यांचा मुलगा सुनील कुळकर्णी यांच्या ताब्यात दिला. काका कुळकर्णी हे आयुर्वेदीक औषधांचे गाढे अभ्यासक व जाणकार होते. त्यांनी अनेक रुग्णांना आयुर्वेदीक औषधांनी बरे केले होते. परोपकारी वृत्ती व दानशूर व्यक्तिमत्वामुळे ते सर्वसामान्यांमध्ये सुपरिचित होते. देवगड व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. देवगड अर्बन को. ऑप. बँकेचे अध्यक्ष पद त्यांनी दहा वर्षे सांभाळले होते. तसेच ते अर्बन बँकेचे माजी संचालक होते. राष्ट्रीय जनसेवक संघाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. देवगड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कुळकर्णी सुपर शॉपीचे मालक व प्रतिष्ठित व्यापारी सुनील कुळकर्णी यांचे ते वडील होत.
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचे ते काका होते. त्यांना अजित नाडकर्णी व कुटुंबीय यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

