रुग्णसेवेसाठी पुढाकार घेत भाजप नेत्यांचा निर्णय
सावंतवाडी :
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू तेंडुलकर हे सहकार्य म्हणून सेवा देणार आहेत. त्या ठिकाणी ॲडमिट असलेल्या रुग्णांची तपासणी ते करणार असून या निर्णयामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, युवा नेते विशाल परब आणि ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी रुग्णालयात फिजिशियन मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही फिजिशियन हजर झालेला नव्हता. त्यामुळे रुग्णांची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी फिजिशियन नेमणे आवश्यक ठरले. त्यामुळे ३० हून अधिक वर्षे सावंतवाडीत सेवा देणाऱ्या डॉ. तेंडुलकर यांना विनंती करण्यात आली आणि त्यांनी सेवा देण्यास तत्परता दर्शवली.
आता डॉ. तेंडुलकर यांच्यासह डॉ. अभिजीत चित्रारी, मुकुंद अंबापुरकर हेही रुग्णालयात सेवा देणार आहेत. त्यामुळे गोवा-बांबोळीला रेफर होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
ॲड. निरवडेकर म्हणाले, “सावंतवाडीतील नागरिकांसाठी हा प्रश्न सुटणे अत्यंत गरजेचे होते. वारंवार मागणी करूनही फिजिशियन येत नसल्याने आम्ही डॉ. तेंडुलकर यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आयसीयूसाठी आवश्यक असलेल्या नर्सेस देण्यासाठीही आम्ही पुढाकार घेत आहोत.” विशेष म्हणजे यांना देण्यात येणारी मानधन मी स्वतः रवींद्र चव्हाण, विशाल परब आणि मी पुढाकार घेऊन देणार आहोत. लागणारे पैसे आम्ही आगाऊ जिल्हा प्रशासनाच्या खात्यात भरणार आहोत. लोकांना चांगली सेवा मिळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या रोटरी, लायन्स क्लब अशा सामाजिक संस्थांनी असाच प्रकारे पुढाकार व जबाबदारी घेऊन या ठिकाणी रिक्त असलेली पदे भरण्यासाठी प्रयत्न केला तरच त्यांच्या निश्चित फायदा नागरिकांना, रुग्णांना होणार आहे.
यावेळी डॉ. तेंडुलकर म्हणाले, या उपजिल्हा रुग्णालयात मी १९९० ते ९५ या काळात सेवा दिली. मात्र नाहक मनस्ताप होत असल्याने मी या ठिकाणी राजीनामा दिला होता. आज सेवाभावी वृत्तीने मी पुन्हा सेवा देण्याची मान्य केले आहे. माझे हॉस्पिटल सांभाळून मी या ठिकाणी असलेल्या रुग्णांना सेवा देणार आहे. रेफर करण्यात येणारे रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र कोणी नाहक मनस्ताप दिल्यास मी या ठिकाणी येणार नाही ही कल्पना आधीच वैद्यकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना मी दिली आहे. एक सामाजिक जाणीव ठेवून मला रुग्णांची सेवा करायची आहे, असे ते म्हणाले यावेळी रवी जाधव उपस्थित होते.

