*के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवलीचे प्रा.प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*
*महाभारतातील एक शापित दानवीर*
महाभारत ही दूरदर्शन वरील सर्वाधिक लोकप्रिय सिरीयल ठरली. त्या सिरीयल मधील श्रीकृष्णाच्या खालोखाल क्रमांक दोनची सर्वाधिक लोकप्रिय भूमिका म्हणजे महारथी कर्ण. ती भूमिका साकारणारे कलाकार पंकज धीर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांची लोकप्रिय भूमिका असलेल्या कर्णाच्या जीवन कथेवर मंथन करताना…. भारत आज जगात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातोय. एका बाजूला तेच तरुण अनेक प्रकारच्या संघर्षांना कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत जीवन नष्ट करत आहेत. एक संवेदनशील शिक्षक म्हणून या आत्महत्या मनाला वेदना देत असतात. जगण्याचे उत्तम सूत्र सांगणारा महाभारत ग्रंथ, त्यातील स्वभावाचे विविध कंगोरे असलेली व्यक्तिमत्त्वांची मांदियाळी. यातील ‘कर्ण’ ही व्यक्तिरेखा म्हणजे संघर्ष किती व कसा करावा लागतो याचे उत्तम उदाहरण.
एकदा राजा कुंतीभोज व राजा शुरसेन दोघे मित्र शिकारीला जातात. जंगलात एक वाघीण आपल्या पिल्लांना दूध पाजत असते. कुंतीभोज राजाने तिच्यावर बाण धरला पण त्याच वेळेस त्याला जाणवले एक आई आपल्या पिल्लांना दूध पाजत आहे. त्याला स्वतःला मूल बाळ नव्हते, तो दुःखी होतो, त्याचे दुःख शुरसेनच्या लक्षात येते. शुरसेन त्याला सांगतो माझं पहिलं अपत्य मी तुला देईल. पुढे त्याला पहिली मुलगी होते, दिलेल्या शब्दाप्रमाणे तो कुंतीभोजला ती मुलगी देतो. राजा कुंतीभोज तिचे नाव कुंती असे ठेवतो. पुढे काही वर्षांनी ऋषी दुर्वासांना एक अनुष्ठान यज्ञ करावयाचा असतो. ते त्या अनुष्ठानाच्या माध्यमातून मनुष्य व देव यांच्यातील अंतर कमी करणार होते. थोडक्यात पण वेगळ्या शब्दात मनुष्य योनी व देव योनी यातील अंतर त्यांना कमी करावयाचे होते. म्हणजेच मनुष्य योनीतून दैवी शक्ती निर्मिती, हा या अनुष्ठानचा हेतू होता. थोडक्यात ऋषी दुर्वासा हे प्राचीन जीवशास्त्रज्ञच होते. यासाठी ते राजा कुंतीभोज कडे गेले. त्याला त्यांनी त्यांच्या अनुष्ठाना बद्दल कल्पना दिली. ऋषी दुर्वासा हे अतिशय तापट म्हणून सर्वत्र ज्ञात होते. त्यांचा राग व त्यानंतर मिळणारा श्राप याची सर्वांनाच भीती वाटे. त्यामुळे राजा कुंतीभोजने त्यांचे स्वागत केले व त्यांच्या अनुष्ठानाला कशाची कमी पडू नये म्हणून ते आपल्या मुलीला म्हणजे कुंतीला दुर्वासा ऋषींची देखरेख ठेवायला सांगितात.
कुंती ने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ऋषी दुर्वासांना त्यांच्या अनुष्ठानासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही अशी सर्व देखभाल व सेवा केली. त्यामुळे दुर्वासा ऋषींचे अनुष्ठान कार्य सफल झाले. दुर्वासा ऋषी राजकुमारी कुंतीवर प्रसन्न झाले आणि जाताना त्यांनी कुंतीला काहीतरी भेट द्यावे म्हणून जे अनुष्ठान केले होते त्यातील सहा देवतांचे मंत्र त्यांनी राजकुमारी कुंतीला दिले व ते म्हणाले की तू ज्या देवतेचा मंत्र बोलशील ती देवता त्याचा अंश तुला पुत्ररूपाने देईन. कुंती त्यावेळी लहान होती. तिला फारसे काही कळत नव्हते. पुढे काही दिवसांनी तिला दुर्वासांनी सांगितलेला मंत्र बोलून बघावा असे वाटले. दुपारची वेळ होती, सूर्य डोक्यावरच होता, म्हणून तिने सूर्याचा मंत्र म्हटला तर साक्षात सूर्यदेवतेचा अंश म्हणून बाळ पुढ्यात आले. ते बाळ सूर्यपुत्र असल्याने त्याचे तेज व जन्मता मिळालेले कवचकुंडल यामुळे ते अत्यंत गोंडस दिसत होते.
आता प्रश्न निर्माण झाला. कुमारिका असतानाचे बाळ! मग ती एका दासीच्या मदतीने त्याला एका पेटीत ठेवते तेव्हा ती अतिशय दुःखी होते व अत्यंत जड अंतकरणाने ती पेटी जवळच वाहणाऱ्या नदीत सोडते. पुढे ही पेटी वाहत वाहत एका कोळी कुटुंबाला मिळते. त्यांनाही मूलबाळ नसते ते त्याला ईश्वरी लीला म्हणून सांभाळतात. हा कोळी म्हणजेच अधिरथ धुतराष्ट्राचा सारथी असतो, त्याची पत्नी राधा म्हणूनच पुढे त्या बाळाचा राधेय, सूतपुत्र, वसुसेन व कर्ण म्हणून उल्लेख मिळतो.
मानवी जीवनात आपल्याला अशीही काही माणसे दिसतात, ती जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत संकटांचा, अपमानांचा सामना करत राहतात. आयुष्यभर स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना सतत संघर्ष करावा लागतो. गुणवत्ता कमी नसते पण संकटे इतकी असतात की गुणवत्ताही थिटी पडते. महाभारतात जितकी माणखंडना कर्णाची झाली तितकी मानखंडना इतर कुणाची झाली नाही, तरी तो एक श्रेष्ठ योद्धा म्हणून आपणास दिसून येतो.
राजपुत्र नाही म्हणून गुरु द्रोणाचार्यांनी शिक्षण देण्यास नकार दिला. तर मी फक्त ब्राह्मणांनाच शस्त्रविद्या शिकवतो हे सूत्र गुरु परशुरामांचे, तेव्हा गुरु परशुरामांकडे शिक्षण घेण्यासाठी जात आडवी येते, पण शिक्षण घेण्यासाठीची त्याची ऊर्जा इतकी उच्च कोटीची होती, की त्यासाठी तो गुरुं परशुराम यांना आपल्या जाती बद्दल खोटे सांगतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर एके दिवशी गुरु परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना, एक अष्टपाद कीटक तेथे येऊन कर्णाचा चावा घेतो व त्याची मांडी पोखरतो. गुरु परशुरामना कर्णाच्या उष्ण रक्ताचा स्पर्श झाल्याने जाग येते व ते त्याला सांगतात तू ब्राह्मण नाहीस. कारण त्यांच्या मते ब्राह्मण इतकी वेदना सहनच करू शकत नाही. तू माझ्याशी खोटे बोललास, त्यामुळे तू माझ्याकडून जे शिक्षण घेतले त्याची तुला जेव्हा सर्वात जास्त गरज असेल तेव्हा ते फलद्रूप होणार नाही असा श्रापही देतात. तेव्हा कर्ण त्याच्या जन्माविषयीची त्याला माहीत असलेली गोष्ट गुरु परशुराम यांना सांगतो. तेव्हा परशुराम दिलेला श्राप परत घेत नाहीत पण त्याला त्यांचा स्वतःचा ‘विजय’ धनुष्य देतात. पण ही विषमता त्याकाळी नसती तर कर्णाला खोटे बोलावे लागलेच नसते. महाभारतकारांनी कर्ण व एकलव्याच्या माध्यमातून या विषयाला स्पर्श केला तर आधुनिक समाजसुधारकांनी या स्पर्शाचा आधार घेत समाजात सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आजच्या लोकशाहीच्या काळात कायद्याने ही विषमता संपवली आहे हे आजच्या पिढीचे महतभाग्यच म्हणावे.
एकदा शब्दवेधी बाणांचा सराव करताना अनावधानाने एका गाईच्या बछड्याची हत्या कर्णाकडून होते. ती गाय एका ब्राह्मणाची असते, त्यामुळे कर्णाला त्या ब्राह्मणाकडूनही श्राप मिळतो, “त्या बछड्याप्रमाणे तुझाही असाच असाय् अवस्थेत वध होईल”.
महाभारतातील अनेकांनी कर्णाला अनेक वेळेला सूतपुत्र म्हणून हिनवले. मुळात एखाद्याला त्याच्या जातीच्या नावाने संबोधित करणे हे काही अभिमानाचे किंवा चांगुलपणाचे लक्षण नाही. प्रचंड अवहेलना व मानखंडना झालेल्या व्यक्तीच्या मनात अवहेलना करणाऱ्या व्यक्ती विषयी एक प्रकारचा राग संताप असतोच बऱ्याच वेळेला या अपमानातून व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण होते किंवा त्याचा मानसिक तोल जातो त्यामुळे त्याच्या हातून चुका होतात महाभारतात ही वेळ कर्णावरही आली. द्रौपदी स्वयंवरात द्रौपदी कर्णाचा सूतपुत्र म्हणून उपमर्द करते व त्याला नाकारते याची जखम कर्णाच्या मनात झालेली दिसून येते. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगात तो तिला अपशब्द वापरतो व त्या अपशब्दा मुळे अर्जुनाच्या मनात त्याच्याविषयी तीव्र राग निर्माण होतो या ठिकाणी जर द्रौपदीने अपमान न करता वेगळ्या शब्दात कर्णाला नाकारले असते तर कदाचित पुढील चित्र बदलले असते.
महाभारत युद्धापूर्वी कर्ण अर्जुना कडून द्रौपदी स्वयंवरात, विराट नगरच्या युद्धात पराभूत झाला असला तरी तो एक महान व्यक्ती होता. त्याच्या महानतेची साक्ष देणारी अनेक उदाहरणे आपल्याला महाभारतात दिसतात.
युद्ध सुरू होण्यापूर्वी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य उलगडून सांगितले. तू पांडवांचा ज्येष्ठ बंधू आहेस. तू पांडवांकडे आलास तर हे सर्व राज्य तुलाच मिळेल व सोबत द्रौपदीही मिळेल, पण कर्णाने दुर्योधनाला दिलेला मित्रत्वाचा शब्द महत्त्वाचा मानला. जे मिळविण्यासाठी पांडवांनी महाभारताचे युद्ध केले ते सर्वच कर्णाला कदाचित युद्ध न करताही मिळाले असते.
भगवान श्रीकृष्णा नंतर माता कुंती नेही कर्णाला तू माझा मुलगा, ज्येष्ठ पांडव आहेस व कृष्णाप्रमाणेच तिनेही कर्णाला पांडवांकडे येण्याचे आवाहन केले. शेवटी कर्ण इतकेच म्हणाला, “माते या चर्चेसाठी ही वेळ चुकीची आहे. एक गोष्ट नक्की की मी अर्जुन सोडून कोणालाही मारणार नाही. काहीही झाले तरी तुझे पाच पुत्र जिवंत राहतील”.
ज्यावेळी सर्व उच्च वर्णीय समाजाकडून अवहेलना होत असताना दुर्योधन मात्र त्याला ‘अंग ‘ देशाचा राजा व जिवलग मित्र बनवतो तेव्हा कर्ण या मैत्रीला शेवटपर्यंत जागतो. पुढील काळात कर्णाची ओळख ‘दानवीर’ सोबतच ‘मित्र असावा तर कर्णासारखा’ अशी ही दिसून येते. दुर्योधनाच्या अनेक न पटणाऱ्या निर्णयात तो दुर्योधनाची साथ देतो उदा. लाक्षागृह प्रकरण, द्युत क्रीडा, द्रोपदी वस्त्रहरण, अभिमन्यू वध.
इतकेच नाही तर स्वतः देवेंद्रानेही छद्म वेशात येऊन कर्णाची कवच कुंडले मागून नेली. कर्णाला माहित होते की त्या कवचकुंडलांमुळे तो अभेद्य राहणार आहे. तरी वेशांतर करून आलेल्या इंद्राला त्याने आपली कवच कुंडले दिलीत. पण आपल्या दानवीरतेला कलंक लागू दिला नाही.
महाभारताचे युद्ध होण्यास ज्या व्यक्ती कारणीभूत ठरल्या त्यात कर्णाचे स्थान फार वरचे आहे. एवढे सर्व होऊनही तो अर्जुना एवढा किंवा त्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो कारण अर्जुनाला त्याचा वध करण्यासाठी तो निशस्त्र होण्याची वाट बघावी लागते. जेव्हा कर्ण अर्जुनाला सांगतो मी निशस्त्र आहे, निशस्त्र व्यक्तीवर शस्त्र चालवणे हे धर्माविरुद्ध आहे, तेव्हा भगवान कृष्ण कर्णाला सांगतात, तू नियमितपणे अधर्माचीच पाठराखण केली. द्रौपदी वस्त्रहरणात, लाक्षागृह प्रकरणात आणि अभिमन्यू वधाच्या वेळी तुझा धर्म कुठे गेला होता.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्यावर दिव्यास्त्र वापरावयास सांगतात. कारण शस्त्र हातात असताना कर्णाचा वध शक्य नाही. हे भगवान श्रीकृष्णांना माहीत होते. कर्णाच्या वधानंतर भगवान श्रीकृष्ण सुद्धा कर्णाच्या शौर्याचे कौतुक करतात.
कर्ण महादानी होता हे सर्वश्रुत आहे पण तो नुसता दाणी नव्हता तर उत्तम शासक होता. तो रोज सकाळी गंगेवर स्नान करून झाल्यावर सूर्यदेवतेला जल अर्पण करताना तो आवाहन करायचा. आज कोणी याचक म्हणून आले आहे का? आणि अशावेळी जो कोणी याचक आलेला असेल व तो जी काही मागणी करेल ती कर्ण पूर्ण करत असे. पण कर्णाच्या राज्यातील जनता इतकी सुखी होती की अनेक वेळा कुणीही याचक म्हणून येत नसे. तरीही कर्ण आपला उपक्रम नित्य सुरू ठेवे. कल्पना करा की आजच्या राजाने जर जनतेला असा प्रश्न विचारला तर…….
महाभारतातील कर्ण हे असे अद्वितीय पात्र होते की ते इतक्या वर्षानंतरही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात वास करत राहते. इतर कोणत्याही पात्राबद्दल इतकी उत्कट भावना मनाला स्पर्श करत नाही. आपण आपल्या मानवी जीवनात जेव्हा जेव्हा महाभारतातील कर्ण नावाचे पात्र वाचू किंवा ऐकू तेव्हा-तेव्हा आपल्याला स्वतःच्या जीवनात आलेले संघर्षाचे क्षण आठवतील. हेच महाभारतातील कर्ण नामक पात्राचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनामध्ये नियमितपणे यश मिळवणारे अर्जुन फार कमी असतात पण सतत संघर्ष करत यश आणि अपयश यांचा खेळ नियतीच्या नावाने झेलत जगणारे कर्ण भरपूर असतात.
उदाहरणार्थ
स्वतःकडे सर्व प्रकारच्या क्षमता असूनही अनेक वेळेला अपमान सहन करणारे कर्ण,
त्या अपमानाने प्रचंड निराश होणारे कर्ण,
ती निराशा कुठेही दाखवू न शकणारे कर्ण,
ती निराशा आतल्या आत सतत ग्रहण करत राहणारे कर्ण,
योग्य त्यावेळी, योग्य त्या व्यक्तीशी कधीही बोलता न येणारे कर्ण,
आणि हे असेच्या असेच मरून जाणारे कर्ण………
महाभारत युद्धातील कर्णपर्वात मला भगवान श्रीकृष्णांसारखा एक उत्तम सारथी मिळावा यासाठी कर्णाने सारथी म्हणून राजा शल्ल्याची निवड केलेली असते. राजा शल्ल्याने पण त्याला मान्यता दिलेली असते, पण युद्धाला सुरुवात होताच शल्ल्याने कर्णाची अवहेलना, मानखंडना करण्यास सुरुवात केली. आपल्याला एकविसाव्या शतकात जीवन जगताना अनेक समस्यांना सामोरे जायचे असते. त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढायचा असतो, तो मार्ग काढण्यासाठी आपल्याला महाभारत युद्धातील कर्णपर्वात सतत कर्णाची उपेक्षा, अवहेलना करणाऱ्या शल्ल्याची नाहीतर कर्माचा सिद्धांत सांगत समस्येतून बाहेर काढणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची मदत घ्यावीच लागेल. प्रत्येकाने एखादी समस्या निर्माण झाली तर ती आयुष्यभर सोबत घेऊन फिरण्यापेक्षा त्या समस्येतून बाहेर काढणारा भगवान श्रीकृष्ण शोधून कदाचित त्यांच्या साहाय्याने त्या समस्येवर मात करता येते का ते पाहणे आवश्यक आहे.
माझ्यासारख्या शिक्षकाला नेहमीच हा प्रश्न पडतो की कर्णाला माहीत होते की आपण कवच कुंडलधारी आहोत, म्हणजे आपण इतरांपेक्षा कोणीतरी वेगळे आहोत, आजूबाजूला घडत गेलेल्या घटनांचा तो स्वतः बळी का पडत गेला? त्याला स्वतःला फार आधीच समजले होते की दुर्योधन अधर्माने वागत आहे व कृष्णलीलाही त्याला माहीत होत्या . मग प्रश्न हाच उरतो की तो स्वतः स्वतःचे सत्य जाणून घेण्यासाठी आधीच भगवान श्रीकृष्णांकडे गेला असता तरी पुढचे अनेक अनर्थ टळले असते.थोडक्यात, महाभारतकार महर्षी व्यासांच्या लीलाही अगाध आहेत.
प्रचंड बुद्धिमत्ता, जन्मतः मिळालेले कवच कुंडले, राजप्रासाद, हे सगळे असूनही संपूर्ण महाभारतात अनेकांनी त्याचा अपमान केला. परंतु कुठेही या अवहेलनेतून त्याने आत्महत्या केली नाही. तो शेवटपर्यंत संघर्ष करीत राहिला. संघर्ष हेच जीवनाचे दुसरे नाव आहे. आजही अनेक लेखकांना, दिग्दर्शकांना, चित्रकर्मीना कर्णाची व्यक्तिरेखा आव्हान देत असते. म्हणूनच महारथी कर्ण, कौ॓ंतेय, राधेय, मृत्युंजय, रश्मीरथी यासारख्या कलाकृतींचा जन्म होतो. एक शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या भविष्यासाठी ही व्यक्तिरेखा अक्षरांकित केली. ही व्यक्तिरेखा पुढील अनेक पिढ्यांना अशीच संघर्षरत राहून जीवन जगण्याची प्रेरणा देत राहील.
धन्यवाद.
लेखक प्रा.प्रशांत शिरुडे
के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली.
prashantshirude1674@gmail.com
9967817876

