*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री नीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन*
मी कोणत्याही रस्त्याने गाडीतून म्हणा, रेल्वेतून म्हणा चालले असेल तर माझं प्रथम लक्ष जातं ते रस्त्याने तोडलेल्या मोठमोठ्या झाडांकडे, त्यांच्या अर्धवट राहिलेल्या, कलर केलेल्या बुंध्यानवर. खूप वाईट वाटतं मला हे असं पाहिलं की .
मानव निर्मित असा होणार हा ऱ्हास पाहून मन उद्विग्न होतं. माणसांनीच स्वतःवर ओढवून घेतलेले हे संकट म्हणजे माणसांनीच चालवलेली वृक्ष तोड. स्वतः ची घरे, फ्लॅट्स, सोसायट्या बांधण्या साठी माणसांनीच किती मोठमोठी झाडं तोडली, खरी जंगलं तोडून सिमेंटची जंगलं तयार केली. घराला, जळणा ला लागणाऱ्या लाकडांसाठी प्रचंड वृक्षतोड केली जातेय. जंगलं च्या जंगलं झाडा विना ओस पडू लागली आहेत. खूप मूल्यवान गोष्टी साठी, जसे की चंदन, या साठी झाडे तोडून विकली जातात .
आपल्या आयुर्वेदामध्ये किती तरी अशा झाडांना महत्व आहे,की ज्या पासून औषधी मुळ्या, खोडं, पानं, फुलं यांचे अर्क काढून आयुर्वेदिक औषधी म्हणा, काढे, चूर्ण वगैरे तयार केले जाते. पण हल्ली खूप प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने अशी किती तरी झाडं नामशेष होत आहेत, झाली आहेत. आपले वटवृक्ष, पिंपळ वृक्ष, कडुलिंब वृक्ष, पळस इत्यादी झाडे कितीतरी महत्वाची आहेत. ज्या पासून आपल्याला चॊविस तास केवळ प्राणवायूच मिळतो. वडाची झाडे तर 100-300 वर्षे जुनी असतात जी आपणास छाया, प्राणवायू देतात. पण आशा मोठमोठ्या झाडांची सुद्धा कापून छुट्टी केलेली दिसते. त्याच बरोबर या मोठया, छोट्या झाडांमुळे जमिनीची धूप थांबते, जमिन सुपिक रहाते . पाऊस पडण्यास मदत होते, हे तर आहेच. वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. त्या मुळे सगळं निसर्ग चक्रच बदलून गेलंय. निसर्ग पण लहरी झालाय. कोणत्याही ऋतूत पाऊस पडतोय, कधी पडतच नाही, कधीही उन्हाळा, पावसाळा, थंडी असं सगळं चक्र विस्कळीत झालंय .हल्ली या विषाणूं मुळे माणसं प्राणवायू अभावी मरायला लागली आहेत. माणसाला हवा विकत घ्यावी लागायला लागली आहे. याला सर्वस्वी मानव निर्मित वृक्षतोड कारणीभूत आहे.
पूर्वी घरा भोवती, बंगल्या भोवती मोठमोठी झाडं असल्याने पक्षी झाडावर घरटे करित. त्यांची किलबिल, चिवचिव, कोकीळे चे आवाज, असे वेगवेगळे सुंदर आवाज येत होते. मुलांना दाखवायला सुद्धा आता चिऊ-काऊ मिळणं दुरापास्त झालंय. पक्षी कुठं घरटी करणार?
आता आपणच अनेक प्रसंगी वृक्षारोपण करायला पाहिजे. आपणच खाल्लेल्या फळांच्या बिया साठवून कुठं फिरायला गेलं असताना त्या योग्य जागा पाहून टाकायच्या म्हणजे पाऊस आला की त्या बिया रुजतील. आंब्याच्या कोयी रस्त्याच्या, मोकळ्या जागेत लावायच्या म्हणजे झाडं येतील. सुरुवातीला थोडं फार पाणी घातलं की ती आपली आपण वाढतात. कोणत्याही कार्यक्रमात नुसतं खड्डे पाडून वृक्षारोपणा चा देखावा न करता, ती झाडं कशी रहातील, कशी मोठी होतील या कडे लक्ष दिलं पाहिजे.
प्रत्येकाने एक तरी झाड नुसतं लावलंच नाही पाहिजे तर, त्याच्या वाढीसाठी, रक्षणासाठी लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही कार्यक्रमांचे वेळी एखादं रोपटे, रोपासाहित कुंडी असं गिफ्ट दिलं पाहिजे. घेणाऱ्याने ते जोपासलं पाहिजे. आम्ही, म्हणजे माझ्या सुनेने , गेल्या वर्षी संक्रांतीला हळदी कुंकवाला रोपासह कुंड्या लुटल्या. चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्या स्वतः पासूनच करावी.
आणि ‘ कल करे सो आज , आज करे सो अब ‘ हे लक्षात ठेवून सुरुवात करावी . चला तर मग, आपणच झाडं लाऊयात , झाडं जगऊयात .
नका करू वृक्षतोड ।
होई ऱ्हास निसर्गाचा ।।
झाडे लावूनी जगवू ।
नफा हाच माणसाचा ।।
© नीता कुलकर्णी
हैद्राबाद
M. No 9527405803

