महिला आरक्षणानंतर सावंतवाडी राजघराण्याचा राजकारणात पुनःप्रवेश; महायुतीच्या नेत्यांशी चर्चेला वेग, शहरविकास आणि परंपरेचं संवर्धन हेच ध्येय
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषदेचं नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने या पदासाठी राजघराण्याच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले इच्छुक असल्याची घोषणा सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी केली. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजवाडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत युवराज लखमराजे, युवराज्ञी श्रद्धाराजे आणि राजेसाहेब खेमसावंत भोंसले उपस्थित होते.
युवराज लखमराजे म्हणाले, ३५ वर्षांपूर्वी आमचे पूर्वज शिवरामराजे भोसले आमदार होते. त्यानंतर आज पुन्हा नगरपरिषद निवडणुकीत सहभाग घेण्याचा विचार आम्ही करत आहोत. महिला आरक्षण पडल्यामुळे श्रद्धाराजेंच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू आहे. लोकांची सेवा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी राजघराणं इच्छुक आहे. तसेच महायुतीच्या नेत्यांशी आमचं बोलणं सुरू आहे. सावंतवाडीच्या जनतेनं दिलेलं प्रेम पाहता पुन्हा या जनतेची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा हेतू ठेवत आहोत. माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्याशी देखील आमची चर्चा झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
दरम्यान, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी पहिल्यांदाच आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या “राजकारण हे माझं क्षेत्र नाही, पण सावंतवाडीच्या विकासासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. शहराचा विकास, परंपरेचं संवर्धन आणि पर्यटन वाढीसाठी मी प्रयत्नशील राहीन. सावंतवाडीला जागतिक नकाशावर आणणे, हे माझं ध्येय आहे. लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे,” असं त्या म्हणाल्या.
संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले म्हणाले, राजकारणात प्रवेश करून सामाजिक आणि विकासात्मक काम करण्याचा आमचा हेतू आहे. माझे वडील पाच वेळा आमदार राहिले. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज आणि राजेसाहेब शिवरामराजे यांच्या कार्याचा वारसा युवराज लखमराजे आणि युवराज्ञी श्रद्धाराजे पुढे नेत आहेत. राजघराण्याची ही १९ वी पिढी राजकारणात येत आहे आणि ती निश्चितच यशस्वी ठरेल,” असा विश्वास राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी व्यक्त केला.
