सावंतवाडीत उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गोवा बनावटीच्या दारूचे १६.२९ लाखांचे बॉक्स जप्त
सावंतवाडी (प्रतिनिधी) :
गांधी सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या दारूबंदी कायद्यांतर्गत तपासणी मोहिमेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज सावंतवाडीत मोठी कारवाई केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून भरारी पथकाने दोन वाहनांतून गोवा बनावटीचे ४५ बॉक्स मद्य जप्त केले. एकूण मुद्देमालाची किंमत १६ लाख २९ हजार रुपये इतकी आहे.
दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. पंच व स्टाफसह भरारी पथकाने छापे टाकून सिल्व्हर रंगाची सेंट्रो झिंग (MH 15 BX 1580) आणि काळी जीप कंपास (GA 03 Y 1363) ही वाहने तपासली. त्यामधून विविध ब्रँडचे गोवा बनावटी मद्य सापडले.
जप्त मुद्देमालामध्ये ४.२९ लाखांचे मद्य व १२ लाखांची वाहने आहेत. या प्रकरणी दत्तात्रय भिमराव बंडगर (रा. सांगली) व गजानन दिनकर पाटील (रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. ए. जाधव आणि दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाईत पथकातील अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला असून, पुढील तपास दु.नि. पाटील करत आहेत. अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

