You are currently viewing सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघातर्फे ५ ऑक्टोबरला ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन

सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघातर्फे ५ ऑक्टोबरला ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन

सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघातर्फे ५ ऑक्टोबरला ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन

सावंतवाडी

सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबई तसेच अंतर्गत कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग व गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी वैश्य भवन, गवळी तिठा, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.

सकाळी १०.३० वाजता प्रतिमा पूजन व पंचशील वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर दीपप्रज्वलन, स्वागतगीत, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रम अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संदीप कांबळे (रत्नागिरी) “महामानव ते बुद्धत्व -सर्वांसाठी एक चिंतनशील प्रवास” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रा. डॉ. संदीप कांबळे हे संस्कृत व पाली भाषेमधून एम.ए. असून पाली व प्राकृत या भाषेमध्ये एम.फील. केलेले आहे. तसेच अॅग्रीकल्चर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग या विषयांमध्ये पीएच. डी. केलेले वक्ते असून ते बौद्ध धम्माचे अभ्यासक आहेत. तर डॉ. विकास कठाणे (माजी प्राचार्य-भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय, सावंतवाडी) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.

या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाजात धम्मक्रांतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारून भारतीय समाजजीवनात नवा अध्याय सुरू केला. त्यातून समता, बंधुता आणि न्याय यांच्या मूल्यांवर आधारित सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली. त्या ऐतिहासिक धम्मक्रांतीला स्मरून प्रेरणा घेणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचा शेवट भिमसूर्य क्रांती ग्रुप, सावंतवाडी यांच्या भिमगीतांच्या कार्यक्रमानंतर होणार असून धम्म अनुयायांनी, सुजान नागरिकांनी धम्म प्रवचनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा