*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कर्जाच्या तप्त उन्हात*
बापाच्या चेहऱ्यावर कर्जाची जाळ पाहून
माय माझी रोज रडायची
मला पाहिल्यावर
कोपऱ्यात जाऊन अश्रू पुसून घ्यायची
या अश्रूच पांग कधी फिटेल
याचा मी रोज विचार करायचो
पाणी पिऊन जाणाऱ्या बापाला
रोज मरतांना बघायचो
सुकलेल्या मातीत
घाम कष्टाचा गाळूनही
मातीत अंकूर फुटायचा नाही
कार्जाने पोकळ झालेल्या बापाची
त्या देवाला जराही दया यायची नाही
तरीही बाप माझा रोज शेतात
राब राब थांबायचा
भूक मारून अश्रू गिळायचा
उन्हातान्हात अनवाणी चालत चालत
माय माझी शेतात यायची
कर्जाच्या तप्त उन्हात
आभाळाकडे बघणाऱ्या बापाच्या
कपाळावरचा घाम पुसायचा
बाप माझा रडायचा नी माय माझी
सुकलेली भाकरी अणि कोरडी चटणी खायला द्यायची
बाप माझा त्या भाकरीचे
तीन तुकडे करायचा
एक स्वतःखायचा नी
एक मायला आणि मला द्यायचा
सोताची आबाळ करून
मायची नी माझी काळजी घ्यायचा
गोष्टीत वाचलं होतं की
देवबा लहान मुलांचं ऐकतो
म्हणून मी देवाला विनंती करायचो
एकदा तरी पाऊस पाड म्हणून सांगायचो
एकदा देवाने ऐकलं
शेतात भरपूर पिकलं
कर्ज टिकण्याच्या आनंदात
बाप माझा नाचायला लागला
देवबा ठगातून बघायला लागला
पण त्या देवाला बापाचा आनंद
पाहवला गेलं नाही
पाऊस अचानक अवकाळी आला
अन् बाप माझा शेतातल्या झाडाला लटकला
त्याच झाडाच्या सावलीत बसून मी
आभाळात गेलेल्या बापाशी बोलायचो
एकदा तरी पाऊस पाड म्हणून
देवाला सांगायला लावायचो
बाप माझ्या स्वप्नात येऊन
माझ्याशी बोलायचा
देवबा आता बहिरा झाला आहे
तो कोणाचंच ऐकत नाही
माझ्याशी तर तो बोलतच नाही
ज्या झाडाला लटकुन
बाप माझा मरून गेला
ते झाडंही आता
बापाच्या वेदनेत रोज मरतय
आणि मी कोरड्या मातीकडे बघून
कर्ज कसं फिटेल यांचा विचार करतोय
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसूमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६८
