You are currently viewing कणकवलीत बिबट्याच्या नखं-सुळ्यांच्या विक्रीचा प्रयत्न हाणून पाडला

कणकवलीत बिबट्याच्या नखं-सुळ्यांच्या विक्रीचा प्रयत्न हाणून पाडला

वनविभागाच्या कारवाईत चार संशयित जेरबंद; १२ नखे, ४ सुळे आणि तीन दुचाकींसह मुद्देमाल जप्त

 

कणकवली :

बिबट्याच्या अवयवांची (नखे व सुळे) विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार संशयितांना कणकवली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कणकवली फोंडाघाट रस्त्यावरील डामरे येथे करण्यात आली.

वनविभागाच्या माहितीनुसार, मौजे डामरे येथील स्वामी समर्थ मठ परिसरात बिबट्याची नखे व सुळे विक्री करण्यासाठी काही अज्ञात व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती कणकवली वनक्षेत्रपाल यांना प्राप्त झाली. त्यानुसार, वनक्षेत्रपाल व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत संशयीतांकडून १२ नखे आणि ४ सुळे (दात) असा वन्य प्राण्यांच्या अवयवांचा महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, त्यांच्याजवळील तीन मोटर सायकली देखील जप्त करण्यात आल्या आहेत. विजय महादेव हळदिवे (रा. फोंडाघाट, ता. कणकवली), कृष्णात भिकाजी रेपे (रा. अकनुर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), तौफीक अल्लाउद्दीन सनदी (रा. गळतगा, ता. चिकोडी, जि. बेळगाव), परशुराम प्रकाश बोधले (रा. नवलीहळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव) यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९, ५१, व ५२ अन्वये गुन्हा (WL०१/२०२८) दाखल करण्यात आला आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास चालू आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी एस के. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस पाटील, वनपाल धूळु कोळेकर, वनपाल देवगड श्रीकृष्ण परिट, वनपाल दिगवळे सर्जेराव पाटील, वनरक्षक सुखदेव गळवे, प्रतिराज शिंदे, सिद्धार्थ शिंदे, रामदास पुगे, नितेंद्र पालेकर, रोहित सोनगेकर, अंकुश माने, स्वाती व्हनवाडे , रिद्धेश तेली, सागर ठाकूर, वन्यजीव रक्षक रोहन भाटे, यांनी केली. याप्रकरणी चौघांची कणकवलीतील वनविभागाच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. बुधवारी संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा