खेमराज बांदाच्या प्रेरणा भोसलेने पटकावलं दुसरं सुवर्णपदक
बांदा
खेमराज बांदाच्या प्रेरणा जय भोसले हिने प्रशिक्षक किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली किक बॉक्सिंग स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली.प्रेरणा भोसलेचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.गेल्याच महिन्यात झालेल्या बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्ण तर कराटे स्पर्धेत ब्रांझ पदक मिळवले होते.
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सोमवारी संपन्न झाली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांचे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.१९ वर्षांखालील मुलींच्या गटात खेमराज बांदाच्या कु.प्रेरणा भोसले हिने अंतिम फेरीत विजय मिळवत सुवर्णपदक मिळवले.
प्रेरणा भोसले ही क्रीडा प्रशिक्षक किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.तिला खेमराज बांदाच्या क्रीडा शिक्षिका सुमेधा सावळ यांचंही मार्गदर्शन लाभलं.प्रेरणा भोसले हिच्या यशाबद्दल धी बांदा नवभारत संस्था,प्रशालेचे मुख्याध्यापक नंदू नाईक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक वर्गातून अभिनंदन करण्यात आलं.दोन सुवर्णपदक व एक ब्रॉंझ पदक मिळवणाऱ्या प्रेरणा भोसले हिचे बांदा परिसरातून अभिनंदन होत आहे.

