You are currently viewing राणेंना आता कोण रोखणार?

राणेंना आता कोण रोखणार?

विशेष संपादकीय……

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली तीन दशके नारायण राणे यांची एकहाती सत्ता होती. परंतु राणेंच्या या सत्तेला सुरुंग लावला तो राष्ट्रवादीतून शिवसेनेत डेरेदाखल झालेल्या सावंतवाडीच्या दीपक केसरकर यांनीच… केसरकरांच्या आमदारकीच्या दमदार एन्ट्री मुळे आणि राणेंच्या विरोधात सडेतोड बोलण्याच्या भूमिकेमुळे केसरकर राज्यभरात लोकप्रिय झाले. जिल्हाभर राणेंच्या दादागिरी आणि दहशदवादा विरुद्ध भूमिका घेतल्याने जिल्ह्यातून त्यांना वाढता पाठिंबा मिळाला आणि राणेंचा कुडाळमधून तर निलेश राणेंचा खासदारकीच्या रिंगणात पराभव झाला. राणेंना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जर कोणी धक्का दिला असेल तर तो केवळ दीपक केसरकर यांनीच… यात लॉटरी लागली ती वैभव नाईक यांना…
शिवसेनेने मागील मंत्रिमंडळात मंत्रिपद दिलेल्या केसरकरांना यावेळी डावलून रत्नागिरीच्या उदय सामंत यांच्याकडे जिल्ह्याची धुरा सोपवली आणि तिथेच शिवसेना जिल्ह्यात मागे पडत गेली. केसरकरांना डावलणे सेनेला खूप सोपे गेले असेल, जिल्ह्यातील सेनेच्या इतर नेत्यांना देखील ते सोयीचे झाले असेल कारण केसरकर हे स्वच्छ राजकारण करणारे नेते, भ्रष्टाचार त्यांच्या जवळपास देखील फिरकत नाही, कदाचित त्यामुळेच सत्तेच्या सारिपाटावरून ते मागे राहिले. त्यानंतर बऱ्याचअंशी राजकारणापासून ते अलिप्त होते, अलीकडेच थोडेफार सक्रिय झालेत, परंतु पालकमंत्री पद दुसऱ्या जिल्ह्यात असल्याने कदाचित ते पक्ष वाढीच्या भूमिकेपासून चार हात लांबच दिसतात.
कालच झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राणेंच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने झालेल्या दौर्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे दिल्लीतील वजन जिल्हावासीयांना दिसून आले. अमित शहा यांनी केलेल्या कौतुकाने आणि नारायण राणे यांना केंद्रात जबाबदारी दिली जाण्याचे दिलेले संकेत यामुळेच पुन्हा एकदा पिछाडीवर पडलेले नारायण राणे राजकारण जोरदार मुसंडी मारण्याची लक्षणे दिसून येत आहेत, आणि शिवसेनेने केसरकर यांच्या सारख्या तगड्या नेत्याला बाजूला ठेवल्याने नारायण राणे यांना टक्कर कोण देणार अशी चर्चा राजकीत नेत्यांमध्ये सुरू आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या भोवती जिल्ह्यातील नेमकी कोण मंडळी असतात हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. गेल्या दीड दोन वर्षात त्यांच्या नेतृत्वात सेनेने काय कमावले हे सुद्धा पाहणे औत्सुक्याचे आहे. सेनेचे मुख्यमंत्री राज्यात विराजमान असताना देखील जिल्ह्यात सेना वाढताना दिसत नाही याउलट विरोधीपक्ष मात्र जोमाने वाढत असून भविष्यात नारायण राणे पुन्हा जिल्ह्यातील एकहाती सत्ता असलेले नेतृत्व म्हणून पुढे येईल, आणि शिवसेनेचा कुठला हुकुमाचा एक्का त्यांना रोखणार? हा प्रश्न मात्र अधांतरी राहील.

This Post Has One Comment

  1. चंद्रकांत नारायण मांजरेकर

    श्री.दिपकभाई म्हणजे सिंधुदुर्गातील एक सुसंस्कृत नेतृत्व.तळागाळातील लोकांचा आधार… आशास्थान.हे नेतृत्व परिपक्व आणि कणखरही आहे हे त्यांनी राणें कुटुंबाची दहशतवादी सत्ता सिंधुदुर्गातून संपवून दाखवून दिले आहे.त्यांचा मंत्री पदाचा काळ जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे.पक्षविरहीत दृष्टीकोन ठेवून सांगायचे तर गेल्या ५० वर्षात कोणीही केलं नसेल असे उत्तम काम करून मा. दिपकभाईनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास केला.अशा सुजाण ‌..कार्यकुशल… अजातशत्रू… कणखर नेतृत्व असलेल्या दिपकभाईना मंत्रीपद नाकारून दिपकभाईंचं माहीत नाही पण आमच्या जिल्ह्यातील जनतेचे अतोनात नुकसान केले आहे. पक्षासाठी तर आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्या सारखे आहे.जनमानसात आजही दिपकभाईन एवढं स्थान जिल्ह्यात दुसऱ्या कोणाही नेत्यास नाही.कोणी कितीही स्वत:चे ढोल बडवून घेतले तरी हे सत्य आहे.
    सेनेजवळ त्या तोडिचे या जिल्ह्यात नेतृत्व नाही ही वस्तुस्थिती आहे.
    अण्णा मांजरेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 9 =