*भर पावसात वेंगुर्ल्यात दुर्गामाता दौड; उत्साहाला अभूतपूर्व प्रतिसाद*
*श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने आयोजन …..*
वेंगुर्ला
वेंगुर्ला शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मुसळधार पाऊस सतत कोसळत असतानाही शेकडो युवक-युवती, बालक, तसेच जेष्ठ नागरिक उत्साहाने या दौडीत सहभागी झाले. जय भवानी-जय दुर्गामातेच्या घोषणांनी संपूर्ण वेंगुर्ला दुमदुमून गेले.
*औक्षण ठिकाणी वातावरण उत्साहपूर्ण*
दौडीची सुरुवात श्री.देव रामेश्वर मंदिर येथुन होऊन शिरोडा नाका येथे महीलांनी पंचारती ओवाळून औक्षण केले . पारंपरिक पोशाखातील महिलांनी आरती ओवाळून, अक्षता व फुलांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मातोश्री नवरात्रोत्सव – दाभोली नाका; गाडीअड्डा नवरात्रोत्सव – मार्केट; आणि चारगदा मारुती मंदिर या प्रमुख औक्षण स्थळांवर नागरिकांनी उत्साहात दौड चे स्वागत केले.
*पावसातही जोश कायम*
लहानग्यांपासून ते तरुणाईपर्यंत प्रत्येक जण पूर्ण ताकदीने दौडीत सहभागी झाला. पावसाच्या सरी अंगावर घेत अनेकांनी “हा उत्सव आपला सण आहे” अशी भावना व्यक्त केली. नागरिकांनी अनेक ठिकाणी पाणी, सरबत व प्रसाद वाटप करून दुर्गामाता दौड मधील सहभागी मंडळींचे मनोबल उंचावले.
*पोलीस व आयोजकांचे कौतुक*
दुर्गामाता दौडीसाठी पोलिस प्रशासनाने उत्तम सुरक्षा व्यवस्था केली होती. वाहतूक व्यवस्थापन, पावसात अडथळा न येऊ देणे, तसेच दुर्गामाता दौड सुरक्षेकडे काटेकोर लक्ष दिले गेले. आयोजक समितीने केलेल्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, विविध नवरात्रोत्सव मंडळांनी सामूहिकपणे सहभाग घेतल्यामुळे शहरात एकात्मतेचा संदेशही अधोरेखित झाला.
*परंपरेची नवलाई*
ह्या वर्षी प्रथमच वेंगुर्लेत दुर्गामाता दौड आयोजन केल्यामुळे ही दौड नवरात्रोत्सवाची खास ओळख ठरली आहे. या दौडीमुळे धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जोपासना यांचा संगम घडतो. पावसाच्या प्रतिकूलतेतही एवढा मोठा प्रतिसाद मिळणे ही या परंपरेची खरी ताकद असल्याचे जाणकारांनी नमूद केले.
