मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात कृषी क्षेत्रातील व्यवसायावर मार्गदर्शन कार्यक्रम .
चिपळूण, मांडकी-पालवण
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर २०२५ रोजी कृषी क्षेत्रातील व्यवसायावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. इंद्रनील चव्हाण यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. त्यांनी तरुणांनी शाश्वत शेतीत आपली भूमिका कशी पार पाडावी, व्यवसायातील जोखीम पत्करण्याची क्षमता कशी विकसित करावी आणि व्यक्तिमत्त्व विकास कसा करावा, यावर मौल्यवान मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानामुळे शेतीत येणाऱ्या अडचणींवर मात करून व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र दिला. श्री. इंद्रनील चव्हाण यांनी ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त क्षमतांना ओळखून त्यांनी भविष्यात योग्य वाटचाल करावी, असे आवाहन केले. तसेच, त्यासाठी त्याग, कठोर मेहनत आणि अडचणींवर मात करण्याची क्षमता अंगी बाळगणे किती महत्त्वाचे आहे, यावरही त्यांनी भर दिला.
या कार्यक्रमाला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका करिष्मा मनेर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अपर्णा यादव यांनी केले.
