You are currently viewing मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीचा ‘स्वच्छ वॉर्ड’ स्पर्धेचा अभिनव उपक्रम

मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीचा ‘स्वच्छ वॉर्ड’ स्पर्धेचा अभिनव उपक्रम

मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीचा ‘स्वच्छ वॉर्ड’ स्पर्धेचा अभिनव उपक्रम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू असून, या अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतींकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीनेही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला असून, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अभिनव ‘स्वच्छ वॉर्ड स्पर्धा’ आणि ‘स्वच्छ घर स्वच्छ अंगण स्पर्धा’ चे आयोजन केले आहे.
​ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चार वॉर्डसाठी ही ‘स्वच्छ वॉर्ड स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत नेमून दिलेल्या उपक्रमांची अंमलबजावणी करत असतानाच, गावामध्ये स्वच्छता व सुव्यवस्था टिकून राहावी आणि ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, या हेतूने ग्रामपंचायतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
​या स्पर्धेमुळे ग्रामस्थांनी आपल्या वॉर्डाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
आपला वॉर्ड सर्वात स्वच्छ कसा राहील यासाठी ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असून, नियोजनाने कामाला लागले आहेत. सरपंच सौ. मिलन पार्सेकर यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, या दोन्ही स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपले घर, अंगण तसेच संपूर्ण वॉर्ड स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा.
​मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य असून, यामुळे संपूर्ण गावामध्ये स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा