*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*स्वयंभू..(विपरीतेतून मार्ग)*
एक होती “बाया आत्या” नि एक होती
“सोना आत्या…
सांगते दुर्दैवातून फुललेली त्यांची कथा
आता ऐका हो जी जी र…तुम्ही लोकं…
जमाना होता जुना, शंभर वर्षे पुराना
बाळपणी होत असे लग्न तिथे कुणाचे चालेना..
खानदानी घरातल्या खानदानी पोरी पण नवऱ्याची तुटली अचानक आयुष्याची दोरी..
परकरातले पाचसहा वर्षांचे वय पण समाजा
समोर बोलायची नव्हती सोय.. करपली कोवळी
कोय कोणास काय त्याचे?
आई वडील भाऊ भाचरे भावजय नणंदा
माहेरी दिवस काढणे सोपे असते का सांगा?
त्यातून ती विधवा मग बघायलाच नको, येता
जाता टोचणार सुई जो तो…
पण.. आई बाप भावांची जोड होती, कोणाची
तिरपा डोळा करून बघायची टाप नव्हती, हळू
हळू जाऊ लागल्या भावाच्या शेतात, मजूर राबवून आणू लागल्या मग तशात..काम मिळाले
हाताला घराबाहेर पडल्या नि आत्मविश्वासाने
झांशी सारख्या फडफडल्या…
गावातले लोक मागू लागले कामासाठी मजुरांचा
जत्था, दोघींना माहित होता मजुर बायकांचा पत्ता
नि पत्ता, जणू स्थापन झाली कामगार युनियन
दोघींची, लोक सोपवू लागले पगाराच्या पैशांची
चंची..
सोना बायाकडे बायकांचा मजुरीसाठी भरे मेळावा,अडाणी बायका तरी बघण्यासारखा असे
देखावा, नाव पुकारताच मिळे आठवड्याची मजुरी हातात, अशा त्या रमल्या दु:ख ठेवून शेतात..
आपण बोलतो पण जो सोसतो त्यालाच असते
माहित, कशी झाली आयुष्याची जळती काहील,
पण वाघिणी सारख्या बांधोबांध फिरत असत..
मानमरातब पैसा अडका बाळगून असत, मानाने
आत्या म्हणून गावात बिरूद मिरवले नि वाजत गाजत एक दिवस स्मशान सजवले..
कोणत्याही झांशीपेक्षा नव्हत्या त्या कमी, क्लृप्ती शोधली आयुष्य जगण्याची नवी, अशा
किती बाया सोना इतिहासात गाडल्या, काही रडल्या सडल्या, दखल घ्याव्या अशा नव्हत्या कुणी त्या नामी, म्हणून त्यांचा झगडा, कर्तृत्व
होत नाही कमी…( मी ही जात असे मजुर सांगायला, याची देही याची डोळा इतिहास
पाहिलेला पण समजत नव्हता आयुष्याचा “खोडा” तेव्हा,केवढा जबरदस्त मारला होता
दैवाने त्यांना “जोडा”)….त्या जमान्यात किती
रडल्या असतील कुढल्या असतील माहित नाही
पण सन्मानाने बोलवत असे घरी त्यांना आई,
बोलवायला मग हीच जात असे ( सुमती)
“बाई”……
अशाच भगिनिंच्या कर्तृत्वाचा करू आता जागर,
बायांनो… फुंका हो आता घागर.. घागर..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक.
(९७६३६०५६४२)
