“सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग’ यांच्यातर्फे ‘जीवनरक्षण’ अभियान सुरू
सावंतवाडीत खड्ड्यांमध्ये बसून आंदोलनाचा इशारा”
सावंतवाडी (प्रतिनिधी) –
सावंतवाडी शहर व परिसरातील धोकादायक खड्डेमय रस्त्यांमुळे वाढणाऱ्या अपघातांच्या घटनांना आळा बसावा, तसेच प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग’ यांच्यातर्फे ‘जीवनरक्षण’ अभियान सुरू करण्यात आले आहे.
या अभियानाअंतर्गत संस्थेने आतापर्यंत स्वतःच्या खर्चातून रु. २३,००० खर्च करून शहरातील काही खड्ड्यांची डागडुजी केली आहे. मात्र संपूर्ण शहरातील आणि परिसरातील खड्ड्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे स्वखर्चाने सर्व खड्डे बुजविणे शक्य नसल्याचे संस्थेचे अध्यक्ष रवी जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
संस्थेने दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशासनाला निवेदन देत येणाऱ्या सोमवारपर्यंत सावंतवाडी शहरातील, बसस्थानक परिसरातील व महामार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.
मात्र प्रशासनाकडून दखल न घेतल्यास दि. ३० सप्टेंबर २०२५ मंगळवारी सकाळी १०:०० वाजता, संस्थेच्या वतीने काजी शहाबुद्दीन हॉल, नगरपरिषद बाजारपेठ, कोलगाव तिठा, भाईसाहेब सावंत समाधी, कोलगाव आय. टी. आय., एस. टी. महामंडळ, भोसले कॉलेजकडे जाणारा रस्ता या ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसून शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणि रस्त्यांची दयनीय अवस्था यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळत नसल्याने गोवा किंवा बांबोळी येथे रुग्णांना रेफर करणे हाच एकमेव पर्याय उरतो. परिणामी, वेळेवर उपचार न मिळाल्याने जीवीतहानीची शक्यता वाढते.
या पार्श्वभूमीवर संस्थेने नागरिकांना आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले असून, आपला पाठींबा लिखित पत्राद्वारे कळवण्याची विनंती केली आहे.
संपर्क:
रवी जाधव
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडी
मो. ९४०५२६४०२७
