सिंधुदुर्गातील लघुउद्योगांना मोठ्या बाजारपेठेत व्यासपीठ उपलब्ध करून देणार – पालकमंत्री नितेश राणे
कुडाळ :
“आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेला गती देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू झाला असून, स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देत भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याची ताकद या उपक्रमात आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, कुडाळ महिला मोर्चा यांच्या वतीने “वोकल फॉर लोकल सेवा पंधरवडा” निमित्त स्थानिक बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. याचे उद्घाटन पालकमंत्री राणे यांच्या हस्ते झाले.
या प्रदर्शनात सुमारे २० बचत गटांनी विविध हस्तकला उत्पादने व खाद्यपदार्थ मांडले होते. यात तपस्या क्रियेशन पिंगुळी, किमया आयुर्वेदिक, माऊली बचत गट कालेली, स्वामी समर्थ परुळे, गायत्री आंबेगाळी, रामेश्वर कुडाळ, कोसंबी अणाव, तेजस्विनी नाबारवाडी, साई समूह पिंगुळी आदी बचत गटांचा समावेश होता.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सौ. श्वेता कोरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, बंड्या सावंत, सौ. संध्या तेरसे, संजय वेगुर्लेकर, आरती पाटील, अदिती सावंत, मुक्ती परब, विजय कांबळी, गजानन वेगुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, “भारतातील स्थानिक बाजारपेठेत इतकी क्षमता आहे की भविष्यात इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. मुंबईसह मोठ्या बाजारपेठांपर्यंत सिंधुदुर्गातील उत्पादनं पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील दोन आठवड्यांत मंत्रालयातच ४० स्टॉल्स उभारून सिंधुदुर्गातील उत्पादने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.”
त्यांनी पुढे आश्वासन दिले की, “लघुउद्योगांना दर्जेदार बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी आमची असून पुढील पाच वर्षांत ती नक्की पूर्ण केली जाईल.”

