You are currently viewing ३.६ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी विकासकाला अटक

३.६ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी विकासकाला अटक

*३.६ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी विकासकाला अटक*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

रेस्टॉरंट मालकाची ३.६३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी एका ५५ वर्षीय विकासकाला अटक केली. आरोपी जयेश तन्ना याने पुनर्विकास प्रकल्पातील घरांबाबत सदर गैरव्यवहार केला होता.

बेलोर शेट्टी (वय ६१) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीत, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला सांगितले की, ही फसवणूक जानेवारी २०१२ ते १७ मे २०२३ दरम्यान झाली आहे. “आम्ही आरोपी जयेश तन्ना याला अटक केली आहे आणि त्याला कोर्टात हजर केले आहे. त्याला २२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, ” असे एका अधिकार्‍यांनी सांगितले.

शेट्टी यांनी आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, मित्रांमार्फत त्यांची २०१२ मध्ये तन्नासोबत ओळख झाली. तन्नाने डी एन नगरमधील त्याच्या प्रकल्पाची माहिती दिली. शेट्टी यांनी एका मित्रासह प्रकल्पाला भेट दिली आणि फ्लॅट बुक करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाच फ्लॅटसाठी एकूण ३.६३ कोटी रुपये दिले.

तन्ना याची कंपनी साई सिद्धांत डेव्हलपर्स देखील एफआयआरमध्ये आरोपी आहे. तन्ना यांना नोव्हेंबर २०१५ मध्ये फ्लॅटचा ताबा द्यायचा होता, असे तक्रारदाराने एफआयआरमध्ये नमूद केले आहे. मात्र, २०१५ पासून हे काम थांबले आहे. फ्लॅट किंवा त्याचे पैसे परत मिळावेत अशी मागणी केली असता तक्रारदाराला कळले की, त्यांनी बुक केलेले तीन फ्लॅट पुनर्विकास प्रकल्पातील भाडेकरूंना आधीच दिलेले आहेत. शेट्टी यांनी विक्रीयोग्य परिसरात दोन फ्लॅट बुक केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा