सावंतवाडीतील धोकादायक खड्ड्यांविरोधात 30 सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन
प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप
सावंतवाडी
शहरातील आणि ग्रामीण भागांतील रस्त्यांवरील खड्डे आता नागरिकांच्या जिवावर बेतू लागले आहेत. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात निष्पाप जीव जात असल्याच्या घटना समोर येत असतानाही शासन व प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे, अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर “सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” या संस्थेच्यावतीने मंगळवार, दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता खड्ड्यांविरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे रवी जाधव यांनी केले आहे.
“याच खड्ड्यांमुळे अजून किती निष्पाप मृत्यू व्हायचे? सरकार आणि प्रशासन नेमकं कधी जागं होणार?” असा सवाल उपस्थित करत, जाधव यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
सावंतवाडीत रस्त्यांची दुरवस्था ही केवळ एक नागरी समस्या न राहता आता ती जीवघेणी ठरत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्याचा अंदाज न येता वाहनचालक अपघाताचे बळी ठरत आहेत. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास अधिक आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
संपर्क:
रवी जाधव
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग
मो.: 9405264027
