सोशल मीडियावरील खोट्या आरोपांवर तीव्र निषेध; संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मालवण :
मालवण येथील पर्यटनाची सोशल मीडियावरून करण्यात आलेल्या बदनामी प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. संबंधित व्यक्तीने याबाबतचे ठोस पुरावे द्यावेत. अन्यथा मालवणात येऊन सर्व पर्यटन व्यावसायिकांची जाहीर माफी मागावी. मालवणच्या पर्यटनाची जर कोणी बदनामी करत असेल तर ते खपवून घेणार नाही असा इशारा ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान याप्रकरणी संबंधीत व्यक्तीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी येथील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याचेही श्री. तोडणकर यांनी स्पष्ट केले. आज जिल्ह्यातील एका व्यक्तीने मालवणच्या पर्यटनाची सोशल मीडियावरून बदनामी केल्याचे निदर्शनास येताच त्याचे तीव्र पडसाद पर्यटन व्यवसायिकांमध्ये उमटले. याबाबत मालवणातील पर्यटन व्यावसायिकांनी बंदर जेटी येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. श्री. तोडणकर म्हणाले, ज्या संबंधित व्यक्तीने मालवणच्या पर्यटनाची जी बदनामी केली त्याचा आम्ही सर्व पर्यटन व्यावसायिक तीव्र निषेध करत आहोत.
संबंधिताने जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे व खोडसाळ आहेत. जर त्याच्याकडे याबाबतचे पुरावे असल्यास त्याने ते सादर करावेत अन्यथा मालवणातील पर्यटन व्यावसायिकांची जाहीर मागावी. पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही बरीच वर्षे प्रयत्न केले आहेत. अशा परिस्थितीत जर व्यावसायिक स्पर्धेतून खोटी माहिती पसरवून येथील पर्यटनाची नाहक बदनामी करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही याबाबत पोलीस ठाण्यात संबधित व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटन व्यावसायिक अन्वेशा आचरेकर यांनीही आम्ही सर्व पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटन वाढण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आम्ही आमचा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहोत. अशा परिस्थितीत जर कोणी मालवणच्या पर्यटनाची बदनामी करत असेल ते आम्ही खपवून घेणार नाही. याबाबत आम्ही पोलीस निरीक्षकांचे लक्ष वेधून संबंधीत व्यक्ती विरोधात कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी फ्रान्सिस फर्नांडिस, अन्वय प्रभू, आबा शिर्सेकर, योगेश मेस्त्री, मनोज मेथर, एजाज मुल्ला, विनायक परब, रोहन आचरेकर, अमोल सावंत, जॉन्सन रॉड्रिक्स, नूतन रोगे, विशाल गोवेकर, किरण हुर्णेकर, महेश कोयंडे, गोविंद धुरी, हेमंत रामाडे, रोहित मेथर यांच्यासह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
