चंपारण्य : बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात हाथरस सारख्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. याठिकाणी १२ वर्षांच्या नेपाळी मुलीवर कथित सामूहिक बलात्कार आणि नंतर हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक चौकशी आणि व्हायरल व्हीडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण स्थानिक पोलीस स्टेशन प्रमुखाच्या मदतीने घडवून आणल्याचे समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक नवीनचंद्र झा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, जो आॅडिओ व्हायरल झाला आहे त्यानुसार स्टेशन प्रमुख संजीव कुमार रंजन यांचा निष्काळजीपणा आणि त्यांनी कर्तव्य न बजावल्याचे स्पष्ट होते. त्यांना निलंबित केले आहे. चौकशीदरम्यान साक्षीदाराचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल.
काय आहे प्रकरण?
नेपाळच्या बारबर्दिया इथे राहणारे सुरेश (बदललेले नाव) गेल्या सात वर्षांपासून मोतिहारी येथील कुंडवा चैनपूर येथे मजुरी करतात. ही घटना २१ जानेवारी रोजी घडल्याचे सुरेश सांगतात. त्यांची पत्नी नेपाळमध्ये आपल्या गावी गेली होती. सुरेश मजुरीसाठी गेले होते आणि मुलगा बाजारात गेला होता. पूर्वी चंपारण येथील सिकहना, विभागीय पदाधिकाºयांना सुरेश यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संध्याकाळी चार वाजता माझा मुलगा बाजारातून घरी येत असताना घरमालकाने त्याला थांबवले. पण तरीही मुलगा घरी पोहचला. आपली बहीण जखमी अवस्थेत त्याला आढळली. मुलाने मला घरी बोलवले. मुलीच्या गळ्याला लाल डाग होते. तिला घेऊन मी स्थानिक डॉक्टरांकडे पोहचलो पण त्यांनी उपचार केले नाहीत.
लोकांची गर्दी जमली आणि त्यांनी मृतदेह जाळण्याचा आग्रह केला. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, देवेंद्र कुमार साह यांनी मृतदेह जाळला नाही तर तुझी आणि मुलाची हत्या करून नेपाळमध्ये फेकू अशी धमकी दिली. यानंतर एका कागदावर माझा अंगठा लावला आणि रात्री बारा वाजता बळजबरीने पोखर रोडवर मीठ आणि साखर टाकून मृतदेह जाळला. दुस-या दिवशी सकाळीच मला (सुरेश) नेपाळला पाठवले.
घटनेच्या १२ दिवसांनी गुन्हा दाखल
२१ जानेवारी रोजी झालेल्या घटनेची तक्रार २ दोन फेब्रुवारीला नोंदवली. एकूण ११ आरोपींचा उल्लेख करण्यात आला. विनय साह, दीपक कुमार साह, रमेश साह, देवेन्द्र कुमार साह या चौघांवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. इतर सात जणांमध्ये घलमालक सियाराम साह यांचा समावेश आहे. मृतदेह बळजबरीने जाळून साक्ष मिटवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.