You are currently viewing श्रीमती सुधा मूर्ती..

श्रीमती सुधा मूर्ती..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

आज नवरात्रोत्सव मधील तिसरा दिवस….

तिसरे पुष्प….

ह्या तिसऱ्या पुष्पासाठी आज जी व्यक्ती मी निवडली आहे, तिचे नाव जरी घेतले, तरी एक साधी सरळ, आपलीशी वाटणारी,आपलीच आई,मावशी असेल वाटणारी वात्सल्य मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते… हो खरचं आहे….या आहेत

 

*श्रीमती सुधा मूर्ती…*

 

सुधा मूर्तींना ओळखत नाही म्हणणारी एक ही व्यक्ती आढळणार नाही. आणि त्याही पेक्षा त्यांना आदर न देणारी व्यक्ती ही शोधून सापडणार नाही. अत्यंत लोभस, गोड असं हे व्यक्तिमत्व आहे…

” साधी रहाणी,आणि उच्च विचारसरणी ” . …

म्हणजे काय असे कुणी मुलांनी विचारले, तर आपण निश्चिंत पणाने सुधाताईंकडे बोट दाखवावे. सतत अंगावर साडी परिधान ,चेहरा सतत हसतमुख, पांढऱ्या होत जाणाऱ्या केसांवर एखादे फुल किंवा गजरा …

काही ही नखरा नाही, की पदाचा अभिमान किंवा गर्वाची चेहऱ्यावर रेषा ही नाही. मला तर त्यांच्या कडे बघून(फोटोत किंवा टीव्ही वर…..प्रत्यक्ष भेटायचा योग नाही आला) नेहमी proud फिल होतं. स्त्री ने कसे असावे ,तर नेहमी जमिनीवर पाय असलेल्या सुधाताईंसारखेच.

 

 

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट ,१९५० साली

शिगगाव-कर्नाटक इथे झाला. या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. विमल कुलकर्णी आणि डॉ. आर.एच. कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत.

 

ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात. आपल्या सर्वांना माहीतच असेल, की संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे संस्थापक  एन.आर.नारायणमूर्ती  ह्यांच्या त्या सुविद्य पत्‍नी आहेत.

सुधा मूर्ती यांना दोन अपत्ये आहेत…

अक्षता आणि रोहन.पैकी अक्षता ही युनायटेड किंग्डम चे पंतप्रधान राहिलेले श्री ऋषी सुनक यांची पत्नी आहे.

 

सुधा मूर्ती यांनी भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग काॅलेजमधून बी.ई. इलेक्ट्रिकलची पदवी सुवर्ण पदकासह मिळवली आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्या संगणक शास्त्रात एम.ई. झाल्या आहेत. तसेच त्यांच्याकडे कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम्. टेक. ही पदवी देखील आहे. त्याकाळी मुलींनी या क्षेत्रात एवढी झेप घेणे कौतुकास्पद होते.

 

सुधा मूर्तीनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले आहे. शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या.

 

बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. या संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या काम पाहतात.

 

सुधाताईंनी सुरुवाती पासूनच समाजकार्यात सहभाग घेतला होता .त्या एक विख्यात सामाजिक कार्यकर्त्या आहेत. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगलोर शहर व परिसरात त्यांनी सुमारे १०,००० शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत. तमिळनाडू आणि अंदमान येथे सुद्धा त्सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही संस्थेने खूप सारी मदत दिलेली आहे.

 

सुधा मूर्ती यांचे अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल, की त्या राज्यसभेच्या राष्ट्रपती द्वारा नियुक्त असलेल्या संसद सदस्य आहेत. अलीकडे नुकत्याच राज्यसभेच्या अधिवेशनात त्यांना बोलताना स्त्रियांचे प्रश्न मांडताना टीव्हीवर बघितलेले आहे.

 

 

कुशल लेखिका सुद्धा आहेत. सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात. त्यांची आजमितीस असंख्य पुस्तके प्रकाशित आहेत.

 

इन्फोसिस फाऊंडेशन या एक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. या संस्थेच्या त्या सह-संस्थापिका आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून सुधामूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांतील विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटक सरकारच्या जवळ जवळ सर्व शाळां मध्ये त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत.

 

सुधाताईंनी हार्वर्ड विद्यापीठात

’ मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडियासी ’

या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे.

 

सुधा मूर्ती यांनी अस्तित्व, गोष्टी माणसांच्या, डॉलर बहु ……या सारख्या अनेक पुस्तकांची निर्मिती केली आहे. सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत. त्यांची लेखणी ही अतिशय सहजतेने ,साधी सोपी वाटावी, वाचकांच्या अंतर्मनात सहजतेने ठाव घेणारी अशी आहे. त्यांनी मराठी ,कन्नड आणि इंग्रजीतून साहित्य संपादित केले आहे….त्यांच्या काही पुस्तकांचे मराठी ,इंग्रजीतून अनुवाद ही केले गेले आहे… जेणे करुन जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येईल ही भावना होती.

 

 

सुधामूर्ती यांना आत्तापर्यंत त्यांच्या कार्य बद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

त्यापैकी महत्वाचे इथे देते आहे…..

स.१९९५ साली उत्तम शिक्षक पुरस्कार (बेस्ट टीचर अवोर्ड )

इ.स.२००१ साली ओजस्विनी पुरस्कार

इ.स. २००६ – भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.

इ.स. २००६ साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्कार

श्री राणी-लक्ष्मी फाऊंडेशनकडून १९ नोव्हेंबर, इ.स. २००४ रोजी राजलक्ष्मी पुरस्कार.

इ.स. २०१० – एम.आय.टी.कॉलेजकडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार.

सामाजिक कामासाठी राष्ट्रीय स्तरावरील सन्मान

सत्यभामा विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट पदवी

इ.स. २०२३ – भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार.

 

पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त अशा

श्रीमती सुधा मूर्ती

या नवदुर्गेस नवरात्र निमित्त माझा मानाचा मुजरा…,🙏🙏

……………………………………………………………

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा