You are currently viewing अंगत पंगत

अंगत पंगत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*

 

*अंगत पंगत*

 

अंगत -पंगत हा शब्दही आता दुर्मिळ झाला आहे. आमच्या लहानपणी आम्ही अगदी सर्रास मैत्रिणींच्या अंगणात आपले ताट घेऊन जायचो. हा कार्यक्रम शक्यतो रात्रीच्या जेवणाला असायचा. म्हणजे आपले घरचे जेवण आपल्या ताटात घेऊन जायचे आणि अंगणात, चांदण्या रात्री छान मैत्रिणीच्या अंगणात अगदी पंगत मांडून जेवायचे. आम्ही अंगत पंगत ची खूप वाट पाहायचो. आपल्या घराजवळ राहणाऱ्या आणि आपलं ताट सहज नेता येणाऱ्या सगळ्यांकडे आम्ही जायचो. ज्यांच्या घरी जायचं ते आम्हाला त्यांच्या घरी केलेला एखाद दुसरा पदार्थही खायला द्यायचे. मग आम्ही जेवणाचा आस्वाद घेऊन घरी जायचो. पुन्हा कोणाकडे कधीतरी अंगत पंगत होईल या आशेने!

हा सगळा प्रकार आजकाल कोणालाही सांगितला तर गंमतच वाटेल. पण खरं सांगू आज पुन्हा एकदा अंगत पंगत करायची वेळ आली आहे. पण ही अंगत पंगत मोठ्यांची हवी. अहो, जरा बघा आपल्या आजूबाजूला. ४०-४५ तील कितीतरी जोडपी दोघेच राहत आहे. आजकाल मुलं बारावी झाली की पुढील शिक्षणासाठी बाहेर जातात. एकदा मुलं बाहेर गावाला गेली कि ती स्वतःच्या घरी पाहुणे म्हणूनच येतात. त्यामुळे घरात नवरा-बायकोच असतात. अशावेळी घर खायला उठतं. बोलायला, गप्पा मारायला तिसरा कोणीच नसतं. अशावेळी आपली ही अंगत पंगत अगदी उत्तम ठरते.

मग ही अंगत पंगत कशी करायची? खूप सोप्प आहे. रोज नाही पण आठवड्यातून किमान एक वेळा किंवा दोन वेळा अंगत पंगत करावी. पूर्वीसारखं अंगणात नाही. पण घरी, गच्चीत आपण करू शकतो. आपण जो स्वयंपाक अगदी आपल्या पुरता केला असेल तो डब्यात घेऊन जावा किंवा एखाद्याने एकच पदार्थ करून आणावा असे पदार्थ करून आणावे आणि तो डबा सगळ्यांनी एकत्र बसून खावा. यामुळे आपला एकाकीपणा कमी होईल. एकमेकांची सुखदुःख वाटता येतील. मुख्य म्हणजे आपल्याला आपली हक्काची माणसं मिळतील.

बाहेर जायचं असल्यामुळे आपण आपले राहणे व्यवस्थित ठेवू. समवयस्कांमुळे लहानपणीच्या, सिनेमाच्या गप्पा होतील. यात आपण गाणी म्हणू शकतो.खेळ खेळू शकतो. जवळच एखादी ट्रिपही काढू शकतो. जीवनाच्या या टप्प्यावर एकांतपणाने निराश न होता पुन्हा एकदा मित्र-मैत्रिणींच्या सहवासात राहून आनंदी राहू शकतो.

चला तर मग आपणच एकमेकांना जपूया आणि हो कोणालाही वाईट न बोलता प्रत्येकाच्या गुणांबद्दल बोललो तर जीवनात सकारात्मक दृष्टिकोन वाढेल.

चला तर मग पुन्हा एकदा अंगत पंगत करून आपले जीवन उत्साही, आनंदी करूया.

 

सौ सीमा श्रीराम शास्त्री मोडक

मुख्याध्यापिका

डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार

प्रतिक्रिया व्यक्त करा