*माध्यमिक विभागात रामगड हायस्कूल तर प्राथमिक विभागात चिंदर बाजार*
मालवण :
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे ‘आदर्श कथामाला शाखा पुरस्कार’ नुकतेच जाहीर झाले असून माध्यमिक विभागातून प्रगत विद्यामंदिर रामगड हायस्कूल तर प्राथमिक विभागातून आकारी ब्राह्मण विद्यामंदिर, चिंदर बाजार शाळेची निवड झाली आहे. आदर्श कथामाला निरीक्षण आणि निवड समितीचे अध्यक्ष सदानंद मनोहर कांबळी यांनी आज एका पत्रकाद्वारे हा निकाल जाहीर केला आहे. दरवर्षी शाळेमधील आठवडा कथामालेचे नियमित आयोजन, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन, पालक आणि शिक्षक यांचे शाळेसाठी योगदान, शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावणे आदी बाबींचे सातत्यपूर्ण निरीक्षण करून समिती ही निवड जाहीर करते.
यापूर्वी मालवण, कणकवली, देवगड आदी परिसरातील बारा कथामाला शाखांना हा पुरस्कार लाभला आहे. जानेवारी 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात साने गुरुजी कथामालेचे पदाधिकारी त्या-त्या शाळेत जाऊन शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचा गौरव करणार आहेत.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप असून शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आणि विद्यार्थीवृंद यांचा गौरव होणार आहे.
या पुरस्काराबाबत सुरेश शा. ठाकूर, अध्यक्ष कथामाला मालवण म्हणाले, “करी रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयांचे! या साने गुरुजींच्या वचनाप्रमाणे ज्या-ज्या कथामालांमध्ये कार्य चालते, त्या-त्या शाळांतील कथामाला शाखा या पुरस्कारांसाठी निवडल्या जातात.” सुरेश ठाकूर यांनी उभय कथामालांचे अभिनंदन केले आहे.
