दोडामार्गमध्ये नवरात्रौत्सवाच्या गोंधळात वडापावच्या गाड्यांवर धाड – २८ हजारांची रोकड चोरी
दोडामार्ग (प्रतिनिधी):
नवरात्रौत्सवाच्या काळात शहरात वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोडामार्ग बाजारपेठेत धाडसी चोरी केली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास भेडशी मार्गावरील लोकमान्य शाखेजवळ उभ्या असलेल्या दोन वडापावच्या गाड्यांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली. या चोरीत साईश उद्धव हरमलकर यांच्या गाडीतून १२ हजार रुपये तर विठ्ठल बापू फाले यांच्या गाडीतून १६ हजार रुपये, अशा एकूण २८ हजार रुपयांची रोकड चोरीस गेली.
या घटनेने स्थानिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी दोडामार्ग येथील पिंपळेश्वर देवस्थानची दानपेटीही फोडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.
