*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*
नवरात्रोत्सव…
नवदुर्गेचा परिचय….
आज नवरात्रीचे दुसरे पुष्प अर्पण करते….
*पहिली महिला भारतीय पोलीस अधिकारी….*
*…..श्रीमती किरण बेदी.….*
किरण बेदी…हे असे एक नाव आहे की नाव उच्चारताच मानाने सॅल्युट ठोकावासा वाटतो.
एन.सी.सी. च्या विद्यार्थिनींचा त्या आज ही एक आदर्श आहेत, जो आमच्यावेळी ही होता.
कर्तबगार, डॅशिंग आणि तितक्याच रुबाबदार अशा किरण बेदी…यांना नवरात्रीचे दुसरे पुष्प मी अर्पण करते.
किरण बेदी यांचा जन्म ९ जून १९४९ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रकाशलाल असे होते. त्यांच्या आईचे नाव प्रेमलता असे होते. किरण यांना तीन बहिणी आहेत . बेदींचा स्वभाव अतिशय धार्मिक नव्हता, परंतु हिंदू आणि शीख परंपरेत (त्यांच्या वडिलांची आई शीख होती) त्या वाढल्या.
किरण बेदी यांचे शिक्षण अमृतसर मधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले. . शिक्षणाबरोबरच किरण बेदी या खेळातही चपळ होत्या. त्या टेनिस चॅम्पियन होत्या. शाळेत असताना त्या एन.सी.सी.त होत्या.
किरण बेदी या शाळेत अव्वल स्थानी होत्या. सर्व क्षेत्रात त्यांचा सहभाग असायचा. त्यांना वाचनाची आवड शालेय जीवनापासूनच होती.
किरण बेदी शाळेच्या ग्रंथालयाचा ही खूप उपयोग करायच्या. पुढे त्यांची अनेक प्रसिद्ध झालेली पुस्तके याचेच गमक होते तर. त्यानंतर त्यांनी ‘गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वीमेन’ यामध्ये प्रवेश घेतला.
पोलीस सेवेतील कारकीर्द सुरू करण्यापूर्वी किरण बेदी या अमृतसर येथील खालसा महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापक होत्या.
किरण बेदी पोलीस अधिकारी होण्याआधी उत्कृष्ट टेनिस खेळाडू होत्या. टेनिस कोर्टवरच किरण बेदी यांची ब्रिज बेदी यांच्याशी भेट झाली. त्यांचा प्रेमविवाह १९७२ साली झाला. त्याच वर्षी त्या आय.पी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
ब्रिज बेदी हे किरण बेदी यांना सरकारी नोकरीसाठी नेहमी प्रोत्साहित करीत राहिले. एका कर्तबगार स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुषाचा हात होता… घरून पाठबळ असेल, तर स्त्री किती उत्तुंग भरारी मारू शकते याचे उत्तम उदाहरण आहे हे.
किरण बेदी या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या.
किरण बेदी यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्त झाल्या. १९९३ मध्ये दिल्लीतील तिहार कारागृहाच्या त्या मुख्य अधीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स) झाल्या. तेथे असताना त्यांनी कारागृहामध्ये अनेक सुधारणा केल्या. इथुनच त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. सर्वजण या आगळ्या वेगळ्या पण प्रशंसनीय जेलरच्या प्रेमात पडले.
तिहार जेलचे कैदी काही साधे कैदी नव्हते. अशा कैद्यांच्यात सुधारणा घडवून त्यांनी जणु क्रांती केली होती. त्याची जागतिक स्तरावर प्रशंसा ही झाली. या सुधारणेसाठी १९९४ मध्ये त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
किरण बेदी यांनी महिलांवरील गुन्हे देखील कमी करून दाखवले. एक ट्रॅफिक पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी १९८२ आशियाई गेम्स साठी दिल्लीत आणि १९८३ मध्ये गोव्यात भरलेल्या सीएचओजीएम बैठकीसाठी
(The Commonwealth Heads of Government Meeting) रहदारी व्यवस्था ही पाहिली.
किरण बेदी यांनी उत्तर दिल्लीच्या डीसीपी असताना ड्रग्जचा दुरूपयोग करण्याऱ्यांविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात केली. ही मोहीम पुढे नवज्योती दिल्ली पोलीस फाऊंडेशन मध्ये विकसित झाली.
२००३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव म्हणून पोलीस सल्लागार म्हणून बेदींनी काम केले.
पुढे मात्र शांतता ऑपरेशन या सामाजिक कार्यक्रम आणि लेखन यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी २००७मध्ये पोलीस खात्याचा राजीनामा दिला.
किरण बेदी यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.जवळ जवळ १५ ते २० पुस्तके प्रसिद्ध आहेत.
त्यापैकी “आय डियर” हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. त्या इंडिया व्हिजन फाऊंडेशन नावाच्या संस्थेच्या संचालक आहेत. २००८-२००९ दरम्यान त्यांनी दूरचित्रवाणीवर
‘आप की कचेरी ‘ हा एक कोर्ट शो देखील आयोजित केला होता. तो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितला असेल.
२०११ च्या भारतीय भ्रष्टाचारविरोधी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी त्या एक होत्या आणि जानेवारी २०१५ मध्ये त्या भारतीय जनता पार्टीत सामील झाल्या.
२२ मे २०१६ रोजी बेदी यांना पॉंडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले.
निवृत्तीनंतर अण्णा हजारे यांच्या लोकपालासाठीच्या आंदोलनात देखील त्या सहभागी झाल्या होत्या.
अशा या कर्तबगार किरण बेदींवर लिहिलेली अनेक पुस्तके ही प्रकाशित झाली आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांच्या वर अनेक सिनेमा ही निघाले आहेत.
जसे की…
कर्तव्यम् (तेलुगू चित्रपट, १९९०)
विजयाशांती आयपीएस (तमिळ चित्रपट)
तेजस्विनी (हिंदी चित्रपट)
स्त्री (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)
इन्स्पेक्टर किरण (दूरचित्रवाणी मालिका)
येस, मॅडम सर ! (मेगन डॉनेमन या ऑस्ट्रेलियन चिर्मात्याने बनवलेला इंग्रजी चित्रपट) : या चित्रपटाला अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा एक लाख डॉलरचा पुरस्कार आणि बार्बारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २५०० डॉलरचा पुरस्कार मिळाला.
अशा या रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्त्रीशक्ती दुर्गा असणाऱ्या किरण बेदी यांना मानाचा मुजरा…..
🙏🙏🙏🙏🙏🙏
……………………………………
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
