You are currently viewing वात्सल्यसिंधु…..आपली माय….अनाथांची माय….

वात्सल्यसिंधु…..आपली माय….अनाथांची माय….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*वात्सल्यसिंधु…..आपली माय….अनाथांची माय..*🙏

 

आज नवरात्र सुरू होत आहे.

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मी नऊ दिवस एकेका स्त्री ची निवड करून ,त्यातील स्त्री शक्तीला वंदन करून ,तिच्यातील नवदुर्गेची विशेषता माझ्या या लेखमालेत उद्धृत करते आहे……

 

या वर्षी निवडलेल्या या नऊ स्त्रिया देखील आपल्या परिचयातील असतील.. त्यांच्यातील दुर्गा रुप आपल्या समोर मांडते आहे….

आशा करते ते आपल्या सर्वांना आवडेल…

आपण वाचून जरूर त्या लेखाखाली आपला अभिप्राय नोंदवा…मला तेवढेच प्रोत्साहन मिळेल….

🙏🙏🙏

 

आपली

पल्लवी उमेश🙏

 

 

 

आज पासून भारतभर नवरात्रोत्सव सुरू होत आहे.

आज नवरात्रीचा पहिला दिवस..

 

 

आज मी नवरात्रीचे पहिले पुष्प अर्पण करत आहे,

 

*वात्सल्यसिंधु…..आपली माय….अनाथांची माय..*

 

पद्मश्री श्रीमती सिंधुताई सपकाळ यांना..

🙏🙏

 

सिंधुताई सपकाळ यांना ओळखत नाही,अशी एकही व्यक्ती आपणास सापडणार नाही.

आज आपल्या सर्वांनाच सिंधू ताईंचे समाजकार्य माहीत आहे. ज्यांना माहीत नव्हते, त्यांना त्यांच्या वर निघालेल्या सिनेमा मुळे सुद्धा समजले…

एकटी स्त्री काय काय करू शकते…हे तिच्यातील गुणांमुळे आपोआप दिसून येते. कोणता ही दिखावा न करता आपले काम करत राहणे…पुढे चालत राहणे… कर्तव्य बजावत घेतलेली जबाबदारी नेटाने तडीस नेणारी ही सामान्य घरातील महिला, आज नवरात्री निमित्त पहिले पुष्प अर्पण करण्यास पात्र ठरते.

 

 

सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८, वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे गावात अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला. घरी नकोशी असलेली ही मुलगी एक अवांछित मूल असल्याने, त्यांचे टोपण नाव चिंधी (“फाटलेल्या कापडाचा तुकडा”)असे ठेवले.पण हीच चिंधी अनेक फाटक्या ठिगळांना जोडते याचा त्यावेळी कोणी विचार ही केला नसेल.घरी अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली.

 

 

सिंधुताई यांचे वयाच्या १२व्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले, जे त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगाव गावात गेल्या. हे लग्न फार काळ टिकले नाही .अत्यंत दारुडा नवरा…बिनकामाचा आणि अतिशय संशयी नवरा असल्याने सिंधुताई कमनशीबी ठरल्या.

 

सिंधुताईंना पोटासाठी बाहेर नोकरी करावी लागली. तिथे जमीनदाराचा अन्याय पाहून त्यांनी आवाज उठवला आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावर चारित्र्याचा संशय घेण्यात आला. नवऱ्याने मागचा पुढचा विचार न करता वयाच्या २० व्या वर्षी, त्यांना त्यांच्या गर्भावस्थेत सोडून दिले. त्या नालायक जमीनदाराने सूड घेण्यासाठी सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या सिंधूताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत गोठ्यातच त्यांची कन्या जन्माला आली. आणि स्वतःच दगडाने आपली नाळ कापली.

 

 

नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या.एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले. आणि इथून पुढे त्यांची एकटीची वाटचाल चालू राहिली. एकट्या मुलीला संभाळता संभाळता वाटेत येणाऱ्या असंख्य अनाथ मुलांची त्या आई कधी बनल्या ते त्यांचं त्यांनाच समजले नाही.

 

 

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.

सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत….त्यांचे हे कार्य आज ही यासंस्था पुढे नेत आहेत हे विशेष.

 

 

सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने परदेश दौरे ही केले होते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे.त्यांच्या मुखात सरस्वतीने वास केला होता.एकापेक्षा एक काव्य सहजतेने त्यांच्या मुखातून प्रसरवत असे.आणि ते कालानुरूप होते…प्रत्येक काळाला ,समाजव्यवस्थेला अनुरूप असे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेचीही स्थापना केली होती.आज ही ते उत्तम कार्य चालू आहे.

 

 

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी

 

“पद्मश्री पुरस्कार “(२०२१)

हा सर्वोत्तम पुरस्कार आहे..

 

महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२) आणि त्याबरोबर असंख्य पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

 

अशा अविरत समाजकार्य करणाऱ्या

 

पद्मश्री श्रीमती सिंधुताई सपकाळ

 

या महान विभूतीचे स्मरण आपण या नवरात्रात केलेच पाहिजे..

दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

त्यांना मानाचा मुजरा…आणि भावपूर्ण आदरांजली…

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 

………………………………………………………….

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा