“कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतेचा संकल्प;
३०० किलो कचऱ्याची सफाई”
देवगड
आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २८२ ग्रामस्थ, विद्यार्थी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत समुद्रकिनारा चकाचक केला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सिंधु कन्या प्रभात कुणकेश्वर बचत गट, प्रगती ग्राम संघ कुणकेश्वर आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान २०० किलो प्लास्टिक आणि ३०० किलो इतर ओला-घनकचरा गोळा करण्यात आला. स्वच्छतेमुळे समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यात भर पडली असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळाली आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर आणि श्री. कोलते यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले व ग्रामपंचायतीला मार्गदर्शन दिले.
स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन सरपंच महेश ताम्हणकर आणि ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली झाले. त्यांनी सहभागी शिक्षक, विद्यार्थी, बचतगट सदस्य, आशा-सेविका, तलाठी श्री. नाईक, देवस्थान ट्रस्ट व विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
स्वच्छतेबाबत जनजागृती घडवत, असे उपक्रम भविष्यातही नियमितपणे राबवण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.

