*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गंधवती* (वृत्त:अनलज्वाला)
नजरा भिडता उरात धडधड अवचित कसली
फुले मोगरा गंधित हलकी तार छेडली ।।ध्रु।।
हिरव्या रानी साद घालतो मंजुळ पावा
त्या सूरांवर झोके घेता गातो रावा
अनोळखी ती चांदण गाणी मनात घुमली
फुले मोगरा गंधित हलकी तार छेडली।।१।।
रानपाखरू फडफड करते इकडे तिकडे
पंख स्पर्श तो अलगद होता खूप आवडे
वेड्या देही कामवात ती का फुरफुरली
फुले मोगरा गंधित हलकी तार छेडली।।२।।
एकच मोहक खळी बावळी लज्जित गाली
नजरी भरता भावना कशी आतुर झाली
दवबिंदूने पाने भिजता धरा हरखली
फुले मोगरा गंधित हलकी तार छेडली।।३।।
मधुगंध मंद दरवळ देतो एक चेतना
फुलते काया प्रणय भावे मिटे वेदना
मिठी अनामिक कल्पनेतली गळ्यात पडली
फुले मोगरा गंधित हलकी तार छेडली।।४।।
*राधिका भांडारकर*
