You are currently viewing अमित शहांच्या दौऱ्याने राणेंचे केंद्रातील वजन दिसले…

अमित शहांच्या दौऱ्याने राणेंचे केंद्रातील वजन दिसले…

विशेष संपादकीय….

सिंधुदुर्ग जिल्ह्यावर जवळपास तीन दशके एकहाती सत्ता असलेले एकमेव दबंग नेते म्हणजे नारायण राणे. आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक आव्हाने पेलत नगरसेवक पासून ते थेट मुख्यमंत्री पदापर्यंत यशस्वी वाटचाल करत आपल्या सोबत आपले कार्यकर्ते, खंदे समर्थक यांना देखील मानाची पदे भूषविण्याची संधी देत कार्यकर्ते न ठेवता लोकप्रतिनिधी, नेते निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे नारायण राणे. आपल्या राजकीय कारकिर्दीत चढ उतार पाहत पक्ष बदलत नारायण राणे अलीकडेच भाजपावासी झाले आणि राज्यसभेवर खासदारकी देत पक्षाने देखील त्यांचा योग्य सन्मान केला, अजूनही त्यांच्या जिल्ह्यातील कामगिरीवर खुश होऊन पक्ष त्यांच्याकडे आणखी मोठी जबाबदारी सोपवणार अशी आशा वाटू लागली आहे.
राणेंच्या स्वप्नातील प्रकल्प म्हणजे जिल्ह्यात अद्ययावत हॉस्पिटल आणि जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना जिल्ह्याबाहेर न जाता जिल्ह्यातच मेडिकल चे शिक्षण घेता यावे म्हणून मेडिकल कॉलेज. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज राणेंच्या स्वप्नातील पहिल्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले. प्रथमच भाजपाचे पहिल्या फळीतील आघाडीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री जिल्ह्यात आले ते फक्त नारायण राणे यांच्या खाजगी मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने, त्यामुळे नारायण राणे यांचे देखील केंद्रात वजन वाढल्याचे दिसून येत आहे.
नारायण राणे हे अन्यायाविरुद्ध लढणारे नेतृत्व असून आम्ही त्यांच्यावर अन्याय करणार नसून पक्ष त्यांचा योग्य तो सन्मान नक्कीच करेल. असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले. जिल्ह्यातील मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जिल्ह्यातच राणे यांच्यामुळे सोय उपलब्ध झाली आहे, त्यामुळे कोणीही मेडिकल शिक्षणापासून वंचित राहणार नसल्याचेही अमित शहा म्हणाले.
अमित शहा यांनी जिल्ह्यात भाजपा वाढत असल्याने नेते आणि कार्यकर्त्यामचे कौतुक केले. भाजपा कोणा एका व्यक्तीचा अथवा कुटुंबाचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना मन लावून पक्ष वाढीसाठी काम करण्याचे सुचविले. नारायण राणे यांचे देखील त्यांनी तोंड भरून कौतुक केले. केवळ नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन समारंभाला केंद्र तसेच राज्यातील बहुतांश भाजपा नेते उपस्थित राहिल्याने नारायण राणे यांचे पक्षातील आणि केंद्रातील वजन चौपटीने वाढल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा