You are currently viewing राजन म्हणजे राजा…राजन आंगणेंना राजस श्रद्धांजली

राजन म्हणजे राजा…राजन आंगणेंना राजस श्रद्धांजली

*राजन आंगणेंच्या शोकसभेत राजन प्रेमींना अश्रू अनावर*

 

सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर राजन आंगणे मित्रपरिवाराने बुधवारी सायंकाळी ६.०० वाजता उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते राजन आंगणेंची शोकसभा आयोजित केली होती. राजन आंगणे यांचा देहांत होऊन दहा दिवस झाल्याने त्यांच्या स्मृतींचा जागर करण्याच्या उद्देशाने आणि राजन आंगणे प्रेमींना आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहता यावी याकरिता श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. जिल्हाभरातून राजन आंगणे प्रेमी मित्रपरिवार या श्रद्धांजली सभेला उपस्थित होता.

राजन आंगणे यांच्या श्रद्धांजली सभेच्या ठिकाणी सुरुवातीपासूनच वातावरण काहीसे शांत, गंभीर झाले होते. राजन आंगणे यांचा मित्रपरिवार अजूनही राजन भाईंच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरला नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. हेल्पलाईन फाउंडेशनचे अनेक सहकारी दुःख आतल्या आत कोंडून ठेवलेल्या अवस्थेत दिसून आले आणि सभा सुरू झाल्यापासून अनेकांचे डोळे भरून वाहू लागल्याचे चित्र दिसत होते. राजन भाई ज्या महेश कुमठेकर व बंड्या नेरूरकर कुटुंबासोबत कुटुंबीय असल्यासारखे राहिले त्या संपूर्ण कुटुंबाला दुःख अनावर झाल्याचे दिसले. राजन भाईंच्या प्रतिमेला पुष्प वाहताना अनेक मित्रांच्या अश्रूंचा बांध फुटला तर काहींचे डोळे आसवांनी डबडबले होते. काहींचे मुखातून शब्द फुटत नव्हते की भावना व्यक्त होत नव्हत्या. रक्ताचे नाते नसताना देखील आपल्या घरातील, नात्यातील सदस्य गेला या भावनेने तलावाचा काठ आसवांच्या धारेत चिंब भिजला होता. राजन आंगणे यांचे आनंद ठोंबरे यांनी रेखाटलेले छायाचित्र राजन भाई अजूनही सोबत असल्याची साक्ष देत होतं. मालवण येथील डॉ.ज्योती रविकिरण तोरस्कर यांनी केलेले सूत्रसंचालन वाखाण्याजोगे होते, त्यातून वेळोवेळी राजन आंगणे यांच्या कार्याची महती ओतप्रोत वाहत होती. त्यामुळे यापूर्वी कधीही कुणाची झाली नाही अशी शोकसभा राजस जीवन जगलेल्या एका महान व्यक्तीची आज सावंतवाडीकरांनी अनुभवली. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सर्वांनी राजन आंगणे यांना श्रद्धांजली वाहिली.

हेल्पलाइन फाउंडेशनचे उपाध्यक्ष शिवशंकर उर्फ बंड्या नेरूरकर, रविकिरण उर्फ विकी तोरस्कर, जितू पंडित, महेश सुकी, महेश कुमठेकर, नकुल पार्सेकर आदी सर्व मित्रपरिवाराने शोकसभेचे उत्तम नियोजन केले होते. या नियोजनावरून राजन भाईंवर मित्रमंडळींचे किती प्रेम आहे याची प्रचिती क्षणाक्षणाला येत होती. प्रत्येक क्षण भावनेमध्ये बुडालेला होता, मित्रांचे चेहरे धीरगंभीर झाले होते. आपला मित्र आपल्याला सोडून गेला परंतु त्याच्या स्मृतींचा जागर नित्य व्हावा यासाठी मोती तलावाच्या काठावर ज्या ठिकाणी ही शोकसभा झाली त्या कट्ट्याला राजन आंगणे यांचे नाव देण्याची मागणी करत तसा प्रस्ताव देण्याचे ठरविण्यात आले. पालकमंत्री महोदयांनी देखील तशी कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जेणेकरून समाजासाठी अहोरात्र झटलेल्या, समाजहितासाठी जगलेल्या राजन आंगणे यांच्या स्मृती चिरंतर आठवणीत राहतील ही त्यामागील भावना आहे.

राजन भाई हे शेवटपर्यंत दुसऱ्यांसाठी जगले. त्यांनी इतरांना हवी ती मदत केली परंतु स्वतःसाठी कधीही कुणाकडेच काही मागितले नाही. प्रशासनापासून राजकारणा पर्यंत सर्वच ठिकाणी राजन भाईंची दांडगी ओळख होती, त्यांच्या शब्दाला वजन होते. काम कोणाचेही असो भाईकडे जो गेला त्याचे काम भाई करणारच हे प्रत्येक जण जाणत होता. असा निस्वार्थी, आपला मित्र परिवार पुढे गेला पाहिजे अशी भावना मनी बाळगणारा, गोरगरिबांना तारणारा, मदतीसाठी सदैव तत्पर असणारा दुसरा कुणीही अलीकडच्या युगात झाला नाही अशा भावना प्रत्येक वक्त्याने व्यक्त केल्या. यावरून राजन आंगणे हे रसायन काय होते याची माहिती होते. आमदार पंकज भुजबळ, टिव्ही कलाकार अंशुमन विचारे आणि अनेक राजन भाई प्रेमींनी व्हिडिओच्या माध्यमातून आपला शोक संदेश पाठवला तर मा.खास.नारायण राणे यांनी श्रद्धांजली सभा सुरू असतानाच ऑनलाईन येत आपला चांगला कार्यकर्ता गेला अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

श्रद्धांजली सभेच्या सुरुवातीस सुधीर धुमे यांनी काव्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या. राजन भाईंचे सहकारी मा.पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, डॉ.राजेश गुप्ता, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मा.आम.राजन तेली, मा.राज्यमंत्री प्रवीण भोसले, श्री.विकास सावंत, मालवण येथील जॉन नऱ्होना, कसालचे संतोष कदम, ॲड.संजू शिरोडकर, प्रा .सतीश बागवे, सेवानिवृत्त उद्योग अधिकारी गावडे, रिक्षा युनियनचे सुधीर पराडकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ॲड.दिलीप नार्वेकर, संजू उर्फ सच्चिदानंद परब, दिनेश चव्हाण, निशांत तोरस्कर, कु.देवयानी कुमठेकर, श्री.सी.एल.नाईक, आदींनी राजन आंगणे यांचे दातृत्व, सच्चे दिलदार वागणे, परोपकारी वृत्ती, मैत्रीसाठी जीव ओवाळून टाकण्याची पद्धत, सामाजिक कार्य, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य क्षेत्रातील कार्य, आपले विविध अनुभव, आणि सर्वकाही स्वतः केलं तरी प्रसिद्धीपासून दूर राहण्याची सवय अशा अनेक सद्गुणांवर आपल्या अनमोल शब्दातून स्तुतीसुमने उधळत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राजन भाईंचे मित्र, सहकारी दीपक पटेकर यांनी स्वतः अनुभवलेला राजन भाई यावर केलेली स्वलिखीत कविता सादर करून काव्यातून भाईंना श्रद्धांजली वाहिली.

प्रास्ताविक करताना रविकिरण तोरस्कर यांनी आपल्या शब्दातून अजातशत्रू राजनभाईंच्या अनेक पैलूंचे दर्शन घडविले. समारोप करण्याची जबाबदारी ॲड.नकुल पार्सेकर यांनी घेतली. राजन भाईंच्या अनेक गुणांचे कौतुक करून आपण हा समारोप करत नसून हीच तर राजन भाईंचे कार्य पुढे सुरू करण्याची सुरुवात आहे असे सांगितले. राजन भाईंचे कार्य पुढे सुरू ठेवणे हीच राजन आंगणे यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रत्येकाने सांगितले आणि राजन आंगणे यांनी सुरू केलेले कार्य पुढेही निरंतर सुरू ठेवण्याचा निर्धार देखील केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा