*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
पाचू कोंदले…
पाचू नटले हिरव्यावरती कोंदण किती सुंदर
एक डहाळी सुंदरशी जपते हिरवाईचं लेणं..
हिरे शोभती लखलख करती पन्ना चमचम करतो
तांबडा गुलाबी पीत किनारी घडवितो सुबक हे देणं…
एक डहाळी इवलाली ती रत्ने ओढूनी नटली
मोतीही टपोरे पानावरती मिरवत दावत सुटली
नाजुक सुंदर पान गुलाबी कळीही दिसे शेजारी
किमयागार तो जरी न दिसला खूण तयाची पटली..
ठाई ठाई रूपसुंदर हे पर्जन्य घेऊनी येतो
हिरेमाणके पाचू मढवून वसुधा रोज खुलवतो
प्रिया दिसावी खूप देखणी मनी का वाटते त्याला
फुलाफुलांचे विभ्रम त्याचे दाखवून मोहवतो…
वसुधेचा तो सखा पाहुणा पाऊस ओततो रूप
मोरही सुंदर पाने ही सुंदर सु मने किती अप्रूप
पानातूनी हिरवाई ती थेंब थेंब ओघळते
धुके विलगता खजिना खुलतो निखळावे ते
कुलूप …
मनात आणा जे जे सुंदर वसुधेवरती आहे
पाऊस करतो किमया त्यात नि हिरवाई मग वाहे…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

