You are currently viewing मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात कु. हर्ष नकाशे याला तिहेरी यश

मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात कु. हर्ष नकाशे याला तिहेरी यश

*मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवात कु. हर्ष नकाशे याला तिहेरी यश*

वैभववाडी

मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत वैभववाडी महाविद्यालयाने आपल्या कलात्मक सादरीकरणातून ठसा उमठवला आहे. या अंतीम फेरीत वैभववाडी महाविद्यालयातील विद्यार्थी कु. हर्ष संजय नकाशे याने भारतीय शास्त्रीय गायन व नाट्यसंगीतात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. तसेच त्याने सुगम गायन या प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक मिळवत “तिहेरी विजेता” म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
ही कामगिरी म्हणजे केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीही अभिमानाची बाब आहे. त्याच्या सादरीकरणात भारतीय शास्त्रीय संगीताची गहनता, नाट्यसंगीतातील भावपूर्ण अभिव्यक्ती आणि सुगम संगीताची सुरेलता यांचा अद्भुत मेळ अनुभवायला मिळाला. उत्तम गायनाने त्याने प्रेक्षक- परीक्षकांसह सर्वांची मने जिंकली. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी हर्ष नकाशेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विशेष कौतुक केले. त्यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले की, हर्ष याच्या कलेतील सातत्य, साधना आणि त्यामागची समर्पित भावना ही प्रेरणादायी आहे. भविष्यात तो राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात आपला ठसा उमठवेल, अशी खात्री वाटते. संस्थेच्या सर्व पदाधीकाऱ्यांनी हर्ष याचे अभिनंदन करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांनी कु. हर्ष नकाशे याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व घेतलेले परिश्रम या यशामध्ये मोलाचे ठरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा