१३ गावांतून जाणाऱ्या महामार्गाला तीव्र विरोध; मोबदला, पर्यावरणीय परिणाम आणि पारदर्शकतेची डॉ. जयेंद्र परुळेकर यांची मागणी
सावंतवाडी :
गणेशोत्सवपूर्वी शेतकरी नेते सिंधुदुर्गात आल्यानंतर, स्थानिक नेतेमंडळींनी हा महामार्ग जिल्ह्याच्या फायद्यासाठी रेडी बंदर किंवा झाराप झिरे पॉईंट येथे आणला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, या १३ गावांना थेट गणेशोत्सवाच्या दरम्यान हरकती नोंदवण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे हरकती कमी येतील, अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा होती, असा आरोप डॉ. परुळेकर यांनी केला आहे.
दरम्यान, हा महामार्ग कसा जाणार? नैसर्गिक स्रोतांवर काय परिणाम होणार? किती बोगदे असतील आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अहवाल जाहीर करा. जमिन संपादनासाठी प्राचीन १९५५ च्या कलम ५५ नुसार मोबदला दिला जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रति एकर मोबदला किती असेल, याची स्पष्ट माहिती घ्या. तसेच हरकती नोंदवण्यासाठी दिलेली ऑक्टोबरची मुदत वाढवावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी १३ गावातील ग्रामस्थांना सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले की, शक्तीपीठ महामार्गाला होणारा वाढता विरोध लक्षात घेता हरकती कमी याव्यात यासाठी ऐन गणेश चतुर्थी हरकती मागविण्यात आल्या. हा महामार्ग कसा जाणार, नैसर्गिक स्रोतांवर काय परिणाम होणार, किती बोगदे असतील, पर्यावरणावर, पाण्यावर त्याचा काय परिणाम होईल, जमीन संपादित करताना किती मोबदला दिला जाईल — या प्रश्नांची आधी उत्तरे द्या आणि नंतरच घोषणा करा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांना सुनावली.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील १३ गावांतून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध होत आहे. आरोग्य सेवांसारख्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून १ लाख १० हजार कोटी रुपयांचा मागितलेला रस्ता कोणासाठी बांधला जात आहे? या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी जमीन मोबदला आणि इतर सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

