फोंडाघाट ग्रामपंचायतीचा राज्यस्तरीय यशाचा ठसा
सरपंच संजना आग्रे यांचा गौरव
फोंडाघाट
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच मंगल कार्यालय येथे पार पडली. या कार्यशाळेत फोंडाघाट ग्रामपंचायतीला २०२४-२५ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये द्वितीय क्रमांक व राज्य पुरस्कृत योजनांमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरपंच सौ. संजना आग्रे, ग्रामपंचायत सदस्य मिथिल पटेल आणि ग्रामसेवक मिलिंद राणे यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या या यशामध्ये ग्रामस्थ, सदस्य, कर्मचारी आणि प्रशासन यांचे मोठे योगदान असून, भविष्यातही हे सहकार्य लाभल्यास ग्रामपंचायत सर्वच पातळ्यांवर पुढे जाईल, असा विश्वास सरपंच संजना आग्रे यांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य अजित नाडकर्णी यांनी फोनवरून सरपंच सौ. संजना आग्रे, ग्रामविकास अधिकारी मिलिंद राणे, सर्व सदस्य आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गावात या पुरस्कारामुळे आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामपंचायतीच्या कामाची राज्यस्तरीय पातळीवर दखल घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

