*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट:३०*
*म्हाळवस*
काकल्या आज संध्याकाळचा घरी आला. आल्या आल्याच त्याने प्रश्न विचारला,” काय रे, बापाशीचो म्हाळ घातलंस?” मी होय म्हणालो. “द्वितीया त्यांची तिथी. आजच त्यांचा म्हाळ होता,” मी अजून स्पष्ट केले.
” आनी आवशीचो केवा?” काकल्याने खवचटपणे विचारले.
मी म्हटलं,” अरे एकाचवेळी सगळ्या पितरांचा होतो. आईसाठी विशिष्ट तिथी नाही.”
“मगे नम वाढतत ता काय?” काकल्या खोलात शिरत होता.
“अरे, त्याला अविधवा नवमी म्हणतात. ती सवाष्ण निधन झालेल्यां महिलांची होते. माझी आई विधवापणात गेली.” मी समजावले.
“इधवेक काय किंमत नाय काय? असला कसला रे तुमचा शास्त्र?झिलग्यांकाच सगळे तिथये वाटून तुमी मोकळे. बायलांक येकच नम. तिय सवाष्णींका. आनी इधवांका कायच नाय. ह्या पटता तुका?” काकल्या जोरात म्हणाला. मी गप्प राहिलो. माझ्याकडे तसे निश्चित उत्तरही नव्हतेच.
थोडे थांबून म्हणालो,”अरे हे बघ. जे काय परंपरेत असेल, ते जमेल तसं करायचं, एवढंच मला माहीत. तुमच्यावर कुणी जबरदस्ती करत नाही.” मी माझी बाजू मांडली.
” सगळ्यात सुधारणा झाली. मगे हेच्यात नको? तुमी धोतरात्सून प्यांटीत इलात. सान्नात्सून इडलीत इलास, नळ्याच्या घरात्सून स्लॅपाच्या घरात इलास. फक्त धर्म आसा तसो चलवचो काय? जा चुकता ता सुधारूक नको?” काकल्या ठामपणे म्हणाला.
“हे बघ. हे आपलं काम नाहीये.”मी
“नसाना, तुका पुढाकार घेवक् काय जाता?हेचो आधार तरी काय , ह्या सोदून काढ.”काकल्या मला कामाला लावीत होता. शेवटी बचाव करण्यासाठी मी विचारले की, “तू घालणार नाहीस काय तुझ्या बाबाचा म्हाळ?” काकल्या होय-नाय काहीच बोलला नाही. ही संधी साधून मी अजून म्हणालो, “अरे हे बघ,सगळ्यांनी महाळ घातला पाहिजे असं काही नाहीये. त्याच्यासाठी पर्यायही दिलेले आहेत. तुम्ही आमान्न दिलं तरी चालतं. तिथी वाढली तरी पण चालतं. स्वामींच्या मठातअन्नदान केलं तरीही चालतं;पण आपण ज्यांचे वंशज, त्या पूर्वजांची आठवण ठेवावी, यासाठी हे आहे.”
” इषय भर्काटता. मी काय विचारलंय आणि तू काय सांगतंस? पूर्वजांची आठवण ठेवची तर तेका बरेच मार्ग आसत. तुमी त्येंच्या नावान पाणपोई सुरू करू शकतास, शाळेक मदत करू शकतास.पून धर्म आणि परंपरा टिकवची म्हंतास, तर काही प्रश्नांची उत्तरा पुढच्या पिढयेक देवची लागतलीच. म्हाळवस निवडलो खेका?, कावळो कित्याक होयो? तीनच पिंड कित्याक?म्हाळात मेल्ल्यांची भरणी केवा घालूची? या सगळ्या प्रश्नांची उत्तरा तुझ्या झिलाक दिलंस नाय, तर तो तुझो म्हाळ काय घालूचो नाय. तुझो धर्म आणि परंपरा हयच् सरतली. हुनान ह्या कामाक लाग.निस्ती बोलान परंपरा टिकणा नाय.” मला न सुटणारे प्रश्न टाकून काकल्या चालू पडला.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी
9403088802
