भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीत अतिक्रमण सिद्ध; संतप्त शेतकऱ्यांचा कोकण रेल्वे प्रशासनाला जाब, ठोस कारवाईची मागणी
बांदा :
कोकण रेल्वेच्या माध्यमातून मडुरा येथील शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीनंतर हा आरोप खरा ठरला असून, कोकण रेल्वे प्रशासन मात्र अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
मडुरा रेल्वे स्थानकासाठी सन १९९१ मध्ये शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, रेल्वेने मूळ हद्दीबाहेर जाऊन शेतकरी प्रकाश वालावलकर यांच्या मालकी हक्काच्या जमिनीवर अतिक्रमण करून रस्ता तयार केला. या संदर्भात त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार केली; परंतु दखल घेतली गेली नाही. शेवटी भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करून मोजणी मागविण्यात आली.
या मोजणीत कोकण रेल्वेने सुमारे ३९ गुंठे जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्पष्ट झाले. अतिक्रमित जमिनीतून रस्ता काढूनही जमीन शेतकऱ्यांना परत देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी आज कोकण रेल्वेचे वरिष्ठ क्षेत्रीय अभियंता रवींद्र पाटील यांना जाब विचारला.
यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी केली. परंतु प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री पाहणी करून कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांचा आरोप खरा असल्याचे मान्य केले असले तरी प्रत्यक्षात तोडगा निघालेला नाही.
शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी या संदर्भात १५ ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी चुकीचे दाखले तयार केल्याप्रकरणी महसूल आणि भूमी अभिलेख विभागावरही तोफ डागली. प्रशासनाच्या निष्क्रीय भूमिकेमुळे स्थानिकांना तीव्र रोष निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांचा इशारा आहे की, काही दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अतिक्रमित जमिनीचा मोबदला मिळावा किंवा जमीन ताब्यात द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच सुरेश गावडे व शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी दिला आहे.
