गणेशोत्सवात संकलन केलेल्या निर्माल्यापासून होणार खत निर्मिती…
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चा वेंगुर्ले येथे उपक्रम
वेंगुर्ले
गणेशोत्सवात डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे श्री बैठक वेंगुर्ला यांच्या माध्यमातून अणसूर ग्रामपंचायत येथे संकलन केलेल्या निर्माल्याचे वर्गीकरण करून त्या पासून खत निर्मिती केली जाणार आहे. आणि हे खत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्षान तर्फे केलेल्या वृक्षलागवडीसाठी आणि वृक्ष संवर्धनासाठी वापरले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रतिष्ठानचा हा उपक्रम सुरू आहे.
गणपती विसर्जन च्या वेळी सर्वांकडील निर्माल्य संकलन करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले. आणि वर्गीकरण केलेले हे निर्माल्य वेंगुर्ले येथील श्री बैठक सभागृहा शेजारील कंपोस्ट खत निर्मिती येथे नेण्यात आले. येथे खत बनविण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील वेंगुर्ले कॅम्प मेथे १०० वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. त्या वृक्षांसाठी हे निर्माल्य संकलन करून त्यापासून तयार केलेल्या खताचा वापर या वृक्षसंगोपनासाठी केला जातो. अन्य कोणत्याही रासायनिक खतांचा वापर श्रीसदस्यांद्वारे केला जात नाही. अशाच प्रकारे डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये कुरण नियोजन, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम हे प्रतिष्ठान राबवत असते.


