You are currently viewing दु:ख वाटे चावळावे…

दु:ख वाटे चावळावे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम कवितेवर शिवाजी साळुंखे “किरण” लिखित सुरेख प्रतिक्रिया*

 

*दु:ख वाटे चावळावे….*

 

सुखदु:ख वाटे चावळावे, चघळती त्या बायका

चटके मनावर ओरखडे दाविती ना बायका..

 

ते रोज मरणे रोज जगणे मार बुक्यांचा बसे

लावूनी कुलूपे बसती त्या का करूनी घ्यावे वाटे हसे?

 

परी फुटतो बांध अवचित कधी पाणवठी वा वावरी

संताप होतो व्यक्त कृतीतून रडवेली होते, हासरी..

 

खोचून काचा साडीचा तो आपटून कापडे

साचलेला मळ निघतो मुखातून अंगार पडे..

 

बरसती अंगारासवे नयनातूनी लाह्या जणू

आसवे पाण्यात पडती सरिता सागरी जणू..

 

मोकळे मग आकाश होते पिळुनी आणखी मुक्त

ते

घेऊन उसना चेहरा मग ती घरी पुन्हा सामावते..

 

कधी न कळते अथवा वळते गेंडासमाजास ती

बंद ओठांवरही चालते रानटी मिजास ती…

 

वळकटी होते तिची मग करकचून ती बांधती

पेटत्या चितेत मग ती पूर्ण होते सारी रिती..

 

रानटी तो प्राक्तनाचा लिहिणारा धनी असे

काय जळते कोणाचे ते अनुभवावाचूनी ….

कळणार कसे?….

 

✒️प्रा.सौ. सुमती पवार, नाशिक

 

*प्रतिक्रिया👇🏻*

 

स्त्री जीवनाचे विदारक जगणे, तिच्या अंतःकरणातील व्यथावेदना, दैनंदिन कामकाज करीत असतांना किंवा शेतात राब राब राबत असतांना भळभळणा-या जखमेसासारख्या सतत वाहत असतांनाही आत दाटलेले मळभ तसेच आतल्या आत दाबून ठेवत हातातील धुतलेल्या कापडातून तो मळ बाहेर पडत आसताना, मनाची झालेली चलबिचल अशी द्विधावस्था कुणाजवळ न मांडता ते अश्रू हसूच्या रुपातून ओठाद्वारे उच्छवासातून सहजपणे बाहेर फेकण्याची कला या जगात फक्त आणि फक्त भारतीय नारीलाच अवगत आहे. हाच या कवितेचा मुलाधार व गाभा देखील होय!

अशी भावाभिव्यक्ती जनमाणसात रुजवणारी ही अप्रतिम अशी कविता आहे!

 

म्हणतात ना, नारीचे खरे दुःख हे नारीलाच कळते.

आपल्या अंतःकरणातील आर्त किंचाळ्या, दाबून ठेवलेले असंख्य हुंदके या पुरुषप्रधान संस्कारांच्या म्हणण्यापेक्षा जोखडात अर्थातच गुलामगिरीत खिचपत पडत राहून कुढत राहत असताना सिसारी येणारं वागणं-बोलणं ऐकत, छाताडावर संस्काराच्या नावाचा बोजड झालेला दगड ठेऊन उघड्या डोळ्यांनी पाहत जगणाऱ्या असहाय अबलेची मला आज तुम्ही खरी ओळख करुन दिलीत.

 

माई!

तुमचे आभार कसे व्यक्त करावे हेच मला कळेनासे झाले आहे.

काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात *अप अगेन्स्ट डार्कनेस* (फिटे अंधाराचे जाळे) ही *मेधा देशमुख भास्करन* लिखीत व *सुनंदा सदाशिव अमरापूरकर* यांनी अनुवाद केलेल्या कादंबरीची मला प्रकर्षाने आठवण झाली! त्याही पूर्वी *नॉट विदाउट माय डॉटर* ही कादंबरी माझ्या डोळ्यांपुढे अक्षरशः थैमान घालीत असलेली मला जाणवली!

माई! खरंच भरुन पावलो मी!

 

समाजात वावरतांना वासनांध नराधमांच्या वखवखलेल्या नजरा, त्यांचे ते अश्लाघ्य, असभ्य असे विचित्र आणि विकृत वागणे-बोलणे हे जर स्त्रियांना मनोमन कळत असूनही, त्या जर व्यक्त होत नसतील तर काय अर्थे आहे अशा निरर्थक आंचट पांचट विषयावरील कविता लिहिण्यात! विविध विषयावर शंभर कविता लिहीत बसण्यापेक्षा, *दुःख वाटे चावळावे!* सारखी एकच कविता लिहिणे हे लाखपटीने चांगले आहे!

 

*दुःख वाटे चावळावे!*

*ही फक्त एक कविता नसून ती स्त्री जीवनावर आधारित एक हृदय हेलाऊन सोडणारी कादंबरीच होय!*

 

आजवर माईंच्या कवितांचा चौफेर वावर मी बघितलेला व अनुभवलेला आहे, परंतु आजच्या कवितेने मात्र त्या सर्वांवर कळस गाठलाय!

 

 

*शिवाजी साळुंके, ‘किरण’*

हल्ली मुक्काम- नांदेड.

प्रतिक्रिया व्यक्त करा