*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*नंदीग्रामचा सिद्धिविनायक*
गणपती हे तर सर्वात लाडके दैवत..
अग्रपूजेचा मान तर त्याला आहेच पण त्याशिवाय तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत सुद्धा आहे. सुप्रसिद्ध अष्टविनायक तर आपल्याकडे आहेतच पण त्याशिवाय काही वैशिष्ट्यपूर्ण गणपतीही आपल्याला आढळतात.
नेहमीच्या रुळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा जरा वेगळी वाट…आडवाट धरली की कितीतरी आश्चर्य, सौंदर्यस्थळे, निसर्ग-नवल समोर येतात. सृष्टीकर्त्या परमात्म्याची ही निर्मिती पाहून थक्क व्हायला होते
त्याच्यासमोर नतमस्तक व्हावेसे वाटू लागते आणि आपण नतमस्तकही होतो. अशाच आडवाटेवरून फिरताना सुखकर्त्या गणेशाची विविध रूपे, विविध स्थाने आपल्या नजरेस पडतात..
कधी तो राजगडाच्या सुवेळा माची मध्ये भेटतो तर कधी हरिश्चंद्रगडावर तर कधी भोरगिरीसारख्या शांत रमणीय गावी तर कधी एरंडोल आजरा इथल्या रम्य प्रदेशात. तो सगळीकडे आहे. सर्वांगसुंदरही आहे. हे आडवाटेवरचे गणेश तुमच्यासमोर आणण्याचे प्रयोजन आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे आडवाटेवरच्या सुखकर्त्याची भेट करून देण्याची ही माझी धडपड … आणि माझी ही धडपड तुम्हा सर्वांना निश्चितच भावेल … अश्या या आडवाटेवरच्या एका गणपतीची ओळख मी आपल्याला करून देत आहे… चला तर मग निघूया या आडवाटेवरच्या गणपतीच्या दर्शनासाठी…!
!! *नंदीग्रामचा* *सिद्धिविनायक*!!
मुंबई पासून रस्ते मार्गे मुरुड अंतर हे अंदाजे १६५ किमी. असून रायगड जिल्ह्यातील मुरुड – जंजिरा या ठिकाणापासून जेमतेम ८ किमी अंतरावर नंदीग्राम उर्फ नांदगाव आहे. या गावी “श्री सिद्धिविनायकाचे” देवस्थान हे जागृत आणि नवसाला पावणारे दैवत … हे मंदिर भव्य आणि प्रेक्षणीय आहे. या मंदिराचा अंतर्भाग अत्यंत सुंदर अश्या कलाकुसरीच्या नक्षीकामाने सुशोभित केलेला आहे. अतिशय शांत आणि अत्यंत रमणीय परिसरामध्ये हे मंदिर वसले आहे. ह्या मंदिराची स्थापना ज्योतिषाचार्य गणेश दैवज्ञ ह्यांनी केली. मंदिरातील मूर्ती अंदाजे ४ फुट उंचीची असून ती उजव्या सोंडेची आहे. गणपतीभोवती प्रदक्षिणा घालताना सर्व बाजूंनी त्याचे दर्शन घेता येते. स्वयंभू मूर्ती असलेल्या या मंदिराला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भेट दिली होती.
“माघ चतुर्थी” या दिवशी विनायकाची जन्मतिथी साजरी केली जाते. तसेच संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी या दिवशीही या स्वयंभू गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रीघ लागते. अतिशय शांत रमणीय असा हा स्वयंभू गणपतीचा परिसर … मनाला निश्चितच आनंद मिळतो.
अलिबागहून नागाव चौल रेवदंडा मार्गे नंदिग्रामी जाता येते. अखंड सागराची सोबत आणि नारळी-पोफळीच्या झाडांच्या सान्निध्यातून हा प्रवास अत्यंत रमणीय असा आहे. येथे येणा-या भक्तांच्या सोयीसाठी देवस्थानातर्फे धर्मशाळा बांधली आहे. येथे भक्त श्रद्धेने देव-दर्शनासाठी येतात…!!
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
