प्रशासनातील दीपस्तंभ
रजत कलेक्टर झाला
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील रजत यावर्षीच्या निकालामध्ये आयएएस ही परीक्षा पास झाला आहे. धामणगाव हे तसे व्यापारी गाव. अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध गाव. हे नाव विद्यानगरी म्हणून ओळखले जाते. कारण इथली धामणगाव एज्युकेशन सोसायटी खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या बाबतीत सशक्त आहे . या संस्थेच्या आदर्श महाविद्यालयात मी मराठीचा प्राध्यापक म्हणून काम केले आहे.या गावातला रजत नावाच्या एक मुलगा गावातच शकतो आणि आयएएस होतो. खर म्हणजे तो दोन वर्षांपूर्वीच आय ए एस झाला असता .पण फोटो चुकला आणि निकाल हुकला असेच म्हणावे लागेल.
पहिल्यांदा आयएएस पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तो आयएएसची मुलाखत द्यायला गेला. फॉर्म भरताना त्याने दाढीवाला फोटो फॉर्म वर लावला होता. प्रत्यक्ष मुलाखत देताना मात्र तो दाढी काढून व दाढी करून मुलाखतीला गेला होता. समितीला फोटोमध्ये आणि त्याच्यामध्ये अंतर जाणवले. आणि त्याच्या नशिबी अपयश आले. दाढीवाला फोटो व प्रत्यक्ष उमेदवार यामध्ये कमिटीला तफावत आढळली. पण प्रत्यक्षात तसे नव्हते .
पण रजत खचला नव्हता.
त्याच्या आई-वडिलांनी अगदी तो गर्भावस्थेत असताना त्याच्यावर खऱ्या अर्थाने आयएएसचे गर्भसंस्कार केले होते. त्याचे जीवन संस्कारातच गेले. त्यामुळे मी ज्याअर्थी या मुलाखतीला पात्र होऊ शकतो. ही संधी चुकली तर येणारी संधी मात्र माझीच आहे .या जोमाने तो तयारीला लागला .
आमचे जिवलग मित्र श्री श्रीराम पत्रे यांचा रजत हा मुलगा. माझ्या करिअरची सुरुवात धामणगावला आदर्श महाविद्यालयामध्ये मराठीचा प्राध्यापक म्हणून झाली होती. त्यावेळेस आमदार अरुण अडसड श्रीराम पत्रे बा.द.महात्मे पद्माकर जोशी प्राध्यापक शरद पुसदकर चेतन कोठारी ही आमची मित्रमंडळी.
श्रीराम पत्रे हे शंभर टक्के सामाजिक व्यक्तिमत्व .शिवाय स्तंभलेखक .खऱ्या अर्थाने त्यांनी समाजसेवा केली. आपल्या भागातील लोकांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी कधी पक्षाचा विचार केला नाही. एकच ध्यास धामणगाव चा विकास आणि मग त्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घातलं .
वडिलांची समाजसेवा पाहून वडिलांचे संस्कार पाहून रजत घडत होता. आपल्या मुलाने राजकारणात न येता कलेक्टरच व्हावे असे त्यांना मनोमन वाटत होते आणि त्यांनी त्याप्रमाणे पेरणी केली. रजत पोटात असतानाच त्यांनी सुशीला वहिनींना संकेत दिले होते की आपला येणारा आपले येणारे बाळ आपल्याला कलेक्टरच करायचे आहे. खऱ्या अर्थाने त्याला राजा करायचे आहे.
रजतचा जन्म झाला आणि श्रीराम पत्रे यांनी रजतवर संस्काराचे अंकुर रुजवण्यास सुरुवात केली. धामणगाव रेल्वे हे आमच्या भागातील प्रसिद्ध गाव आहे. व्यापारी पेठ शिक्षण संस्था यामुळे ते चर्चेत आहे. इथले शिक्षण ही दर्जेदार आहे. धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या सेफला हायस्कूल मधून रजत दहावी झाला. तेव्हाचे मुख्याध्यापक श्री जोशी यांनी त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. घरी आई-वडिलांचे प्रोत्साहन व शाळेत जोशी सरांचे प्रोत्साहन त्यामुळे त्याला योग्य ते खतपाणी मिळाले. दहावी
दहावी पास झाल्यानंतर बहुतांश मुले मेडिकल आणि इंजीनियरिंगचा विचार करतात त्याचे वडील म्हणाले रजत इंजिनियर हजारो असतात डॉक्टर हजारो असतात पण कलेक्टर कमीच असतात बघ विचार कर तुला कलेक्टर व्हायचे आहे त्याप्रमाणे आपण नियोजन करू या .
आपल्या दहावी पास झालेल्या हुशार मुलाला त्यांनी चक्क कला शाखेत टाकले आणि तेही पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये. त्याने अकरावी बारावीला कला शाखा निवडली तर याचा उपयोग रजतला आयएएसची तयारी साठी होईल. अकरावी बारावी झाल्यानंतर पदवी परीक्षा देण्यासाठी तो दिल्लीला गेला. तिथल्या श्री शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. भूगोल हा त्याचा आवडता विषय .त्याच विषयात त्याने उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले. त्याचबरोबर आय. ए .एस.च्या अभ्यासात त्याने कुठेही खंड पडू दिला नाही
रजत 25 वर्षाचा झाला .त्याचे बाबा म्हणाले बघ रजत. मुलं पंचवीस वर्षे झाल्यानंतर नोकरीला लागतात. आई-बाबांना पैसे पाठवतात. आता मी तुला पैसे पाठवत आहे. तू आय ए एस होईपर्यंत मी पैसे पाठवणारच आहे. तू खचून जाऊ नकोस.
रजतने मनोमन विचार केला. हे खरेच आहे .आपण 25 वर्षाचे झालो आहोत. आई-बाबांना आता पैसे मागावयाचे नाहीत आणि मग त्याने जो आय ए एस चा अभ्यास सुरू केलेला होता त्या बळावर त्याने तिथल्या कोचिंग क्लास मध्ये शिकवणे सुरू केले .श्रीराम पत्रे सांगत होते. आता रजत 28 वर्षाचा झालेला आहे. मी गेल्या तीन वर्षात त्याला एक रुपयाही पाठवला नाही. जिथे आयएएस करणाऱ्या दिल्लीतील मुलांना लाखो रुपये पाठवावे लागतात. तिथे रजतने आई-बाबांना एक रुपयाही आहे न मागता जी उंची गाठलेली आहे आणि जी तीनशे पाच रँक त्याला मिळालेली आहे ती निश्चितच नोंदणीय आहे .
मागे रविवार दिनांक 26 एप्रिल रजत दिल्लीवरून नागपूरला आणि नागपूरवरून धामणगाव ला आला. धामणगाव शहरात राहणाऱ्या नागरिकांना इतका आनंद झालेला होता की त्यांनी रजत पत्रे गौरव समिती सत्कार समिती गठित केली होती. माझा विद्यार्थी चेतन कोठारी सांगत होता की आम्ही व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता आणि त्याच्या सत्काराची त्याच्या जल्लोषाची त्याच्या मिरवणुकीची तयारी केली होती.
त्याला नागपूर विमानतळावरून आणण्यासाठी सात आठ गाड्या नागपूरला गेल्या आणि धामणगावला पहिले स्वागत झाले ते शिवाजी चौकात आणि शिवाजी चौकातून त्याची वाजत गाजत मिरवणूक पूर्ण धामणगावात फिरली. . शहीद भगतसिंग चौक . कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकात मिरवणूक फिरून आल्यानंतर शिवाजी चौकात असलेल्या रजतच्या घरासमोरील पटांगणात त्याचा सत्कार आयोजित केला होता. मिरवणूक तीन तास चालली आणि रात्री नऊ वाजता घरासमोरील परिसरामध्ये त्याचा सत्कार झाला.
आमच्या भागातील खासदार व स्पर्धा परीक्षा विषयी आस्था असणारे माजी आमदार माजी कृषिमंत्री आणि सद्यस्थितीत खासदार असलेले डॉ. अनिल बोंडे यांनी दोन मे ह्या तारखेला दुपारी पाच वाजता अमरावतीला श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये स्पर्धा परीक्षेचे द्रोणाचार्य पुण्याचे श्री अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते त्याचा सत्कार ठेवला होता.. मागे डॉ. अनिल बोंडे जेव्हा एकदा धामणगावला आले होते .तेव्हा ते म्हणाले होते .धामणगाव एज्युकेशन सोसायटीमध्ये शिकणारी मुले डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत .पण कलेक्टर झाली पाहिजे ना . राज्याचे वडील श्रीराम पत्रे म्हणाले होते सर तो दिवस दूर नाही. तो दिवस आला आहे. आणि माझा मुलगा शंभर टक्के कलेक्टर होणार आहे. मी जेव्हा बोंडेसाहेबांना ही गोष्ट सांगितली. त्यांना खूप चांगले वाटले .उशिरा का होईना धामणगाव शहरात मुलगा सनदी परीक्षा पास झाला आहे.
रजत पास होण्याची अजून एक कारण आहे .त्याच्यावर लहानपणापासून वडिलांनी काळजीपूर्वक मेहनत घेतली आहे. आम्ही देखील मुलांना दुसऱ्या वर्गापासून फक्त एक रुपयात आय ए एस चे प्रशिक्षण देतो. श्री श्रीराम पत्रे व सौ वहिनी साहेबांनी रजतचे व्यक्तिमत्व घडवले आहे. व्यक्तिमत्व असे घडवलं की त्यामुळे तो कुठल्याही कुसंस्काराला बळी पडला नाही . रजतचे वडील श्रीराम पत्रे माझे मित्र. ते मला म्हणाले की साधं सुपारीचे व्यसन देखील त्याला नाही. आजकाल अनेक उदाहरणं आहेत की पुण्या मुंबईला दिल्लीला या परीक्षेची तयारी करणारे मुलं घरून भरपूर पैसे बोलावतात आणि उधळपट्टी करतात .आमच्या अमरावतीत देखील स्पर्धा परीक्षेची नगरी असलेल्या गाडगे नगर या भागामध्ये तुम्ही सायंकाळच्या वेळेस गेले तर तुम्हाला किमान दोन किलोमीटर पर्यंत रस्त्यावरच्या सगळ्या खाद्यपदार्थाच्या गाड्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या दिसतील. पण आई-वडिलांनी केलेला सुसंस्कारामुळे रजतला कुठल्याही प्रकारचे व्यसन लागले नाही आणि त्यामुळे रजत वयाच्या 28 वर्षी तिसऱ्या प्रयत्नात आयएएस झालेला आहे .
आमच्या अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी प्रयत्न करून तीनशे पाच रँक घेऊन आयएएस झालेला आहे हे आमच्यासाठी भूषणाची बाब आहे .त्याचे गावोगावी सत्कार झाले आहेत आणि त्याचे वडील श्रीराम पत्रे मला म्हणाले होते की सर माझा मुलगा कलेक्टर होऊन नाही चालणार . या भागातले मुलं स्पर्धा परीक्षेला बसले पाहिजेत .मोठ्या संख्येने ते यशस्वी झाले पाहिजेत. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे .रजतचा दुसरा भाऊ गर्भित .तो पण या परीक्षेची तयारी करीत आहे. तो सध्या दिल्लीलाच आहे . परीक्षेची तयारी करत आहे .पण जंगी सत्कार्याला त्याची देखील उपस्थिती होती. श्रीराम पत्रे यांनी विद्यमान आमदार श्री प्रताप अरुणराव अडसड यांना जसे निमंत्रित केले तसेच माजी आमदार श्री वीरेंद्र जगताप यांना देखील निमंत्रित केले होते. स्पर्धा परीक्षेत राजकारण आणायचे नसते. रजत आयएएस झाला हा सर्वांचा गुणगौरव आहे . त्यामुळे श्री प्रताप अडसड आणि श्री वीरेंद्र जगताप यांनी येण्यास संमती दिलेली होती.ही आनंदाची बाब आहे.
लोकप्रतिनिधींनी अजून थोडा पुढाकार घेतला तर महाराष्ट्रातील आयएएसचे चित्र बदलू शकते. आम्ही पुढाकार घेतला आणि 23 चा आकडा 93 वर नेऊन पोहोचवला. त्यासाठी गेले 25 वर्ष आम्ही सतत राबत आहोत. मुलांना लहानपणापासून आयएएस संस्काराचे धडे देत आहोत. श्रीराम पत्रे यांचा आदर्श पालकांनी शिक्षकांनी नागरिकांनी लक्षात घ्यावा आणि मोठे झाल्यावर आमची मुलं बिघडली आमची मुलं आमच्या मताने ऐकत नाही असे म्हटल्यापेक्षा त्यांच्यावर लहानपणीच जर संस्कार केले अनावश्यक लाड टाळले तर ती मुले देखील आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतात असे उद्गार रजतचे वडील यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केले होते
मिशनचे आम्ही सर्वजण रजतच्या सत्काराला धामणगाव रेल्वेला गेलो होतो .मिरवणूक मध्ये सहभागी झालो होतो. त्याच्या सत्काराचे भाषण ऐकले होते. . रजतच्या वडिलांनी इतरही मुलांना स्पर्धा परीक्षा बाबतीत जागे करायचे ठरवले आहे. ही अतिशय जमेची बाजू आहे. माझा मुलगा झाला म्हणजे झाले असं नाही. त्यांचा जोश समाजसेवेचा लोकसेवेचा पिंड आहे . म्हणूनच ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे .रजत वर लहानपणी संस्कार करणारे श्री श्रीराम पत्रे तसेच सन्माननीय सुशीला वहिनीसाहेब ह्या अभिनंदनास पात्र आहेत .
================
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
