पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘जनता दरबार’चा सकारात्मक परिणाम;
35 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सीताबाई जंगले यांच्या घरी गणेश चतुर्थीला लागली लाईट
शिवापूर (कुडाळ) – वार्ताहर
कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर (चाफेली) येथील सीताबाई रामा जंगले या वयोवृद्ध महिलेच्या घरात अखेर 35 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर वीजप्रवाह सुरू झाला. ही ऐतिहासिक घडामोड पालकमंत्री नितेश राणे यांच्या “जनता दरबार”मध्ये सादर केलेल्या निवेदनानंतर शक्य झाली आहे.
जंगले कुटुंबीयांनी अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर विद्युत कनेक्शनसाठी पाठपुरावा केला, मात्र त्यांना यश मिळत नव्हते. अखेर पालकमंत्री नितेश राणे यांच्या “जनता दरबारात” आपली व्यथा मांडल्यानंतर वीज वितरण विभागाने चार महिन्यांत झपाट्याने काम सुरू करून नवीन लाईन टाकण्याचे काम पूर्ण केले. या प्रक्रियेत नवीन पोल उभे करण्यात आले, काही जमिनी मालकांनी आपली झाडे कापून वीज लाईनसाठी सहकार्य केले.
या उपक्रमात खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांचेही मार्गदर्शन लाभले. जंगले कुटुंबीयांनी सर्व राणे कुटुंबीयांसह स्थानिक ग्रामपंचायत व वीज वितरण अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
या कामात सरपंच दीप्ती सावंत, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, माणगाव विभागाचे शाखा अभियंता शेळके, ठेकेदार पावसकर यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. स्थानिक ग्रामस्थ व पोलसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या नागरिकांनीही मनःपूर्वक सहकार्य केले.
या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे हळदीचे नेरूर गावाचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून, चाफेली परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 35 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेले हे प्रकाशपर्व खऱ्या अर्थाने गणेश चतुर्थीला खास बनले.

