सिंधुदुर्गनगरी :
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिव्यांग बालकांची ओळख, तपासणी करण्याकरीता जिल्ह्यामध्ये २ ऑक्टोंबर २०२५ रोजी सावंतवाडी येथे शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शिबाराची रुपरेषा ठरविण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
जिल्ह्यातील दिव्यांग मुलांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ, दिव्यांग मुलांचे आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड, यूनिक डिसेबिलिटी ओळखपत्र व वैद्यकीय तपासणी अशा विविध प्रकारचे लाभ मिळण्याकरीता या शिबीराचे सावंतवाडी येथे ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजन करण्यात येणार आहे,असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
याशिबिरामध्ये आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, दिव्यांग विभाग तसेच जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सर्व शासकीय शाळा व अशासकीय संस्था (NGO) तसेच विविध विभागांचा सहभाग असणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपूर्णा गुंडेवाडी, तसेच तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी, कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ व दोडामार्ग या कार्यालयांशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग या कार्यालयाचा ई-मेल आयडी dlsa-sindhu@bhc.gov.in, संपर्क क्र. ०२३६२-२२८४१४, ८५९१९०३६०७, हेल्पलाईन क्रमांक-१५१०० वर संपर्क साधवा.
